राजकारणात आपले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कोणत्याही मार्गाचा अवलंब करणे हा जणू अलिखित नियम बनला असून त्याचे प्रत्यंतर भाजपच्या सदस्यता नोंदणी अभियानात येत आहे. पक्षातील आपले स्थान अबाधित ठेवण्यासाठी काही मंडळींकडून आपल्या शिक्षण संस्थेतील विद्यार्थी, शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वेठीस धरले जात आहे. अलीकडेच भाजपमध्ये प्रवेश करणारे आ. अपूर्व हिरे यांच्या शिक्षण संस्थेत विद्यार्थ्यांना बळजबरी भाजपचे सदस्य करवून आणण्यास सांगितले जात असल्याचा आरोप मनसेने केला आहे. या स्वरूपाची तक्रार पालक वर्गही करीत असून ज्या ज्या ठिकाणी असे प्रकार घडल्याचे सांगितले जाते, त्या महाविद्यालयाने मात्र असे काही घडले नसल्याचा दावा केला आहे.
आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवत भाजपने नोव्हेंबरपासून सदस्यता नोंदणी अभियान हाती घेतले आहे. हे अभियान यशस्वी होण्यासाठी पक्षातील विविध आघाडय़ा सक्रिय झाल्या असल्या तरी काहींनी यापासून दूर राहणे पसंत केले आहे. काही मंडळींनी हे अभियान राबविताना साम-दाम-दंड भेद नीतीद्वारे आपले लक्ष्य साध्य करण्याचे ठरविले आहे. भाजपवासी झालेले आ. अपूर्व हिरे यांच्या महात्मा गांधी विद्या मंदिर शिक्षण संस्थेच्या अंतर्गत असणाऱ्या शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना या कामी जुंपण्यात आल्याची तक्रार आहे. शिक्षण संस्थेची विविध विद्यालये, आश्रमशाळा, वेगवेगळ्या शाखांची महाविद्यालये आहेत. त्यात २० हजारांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. एरवी या संस्थेतील शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर निवडणुकीत प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष प्रचारासह अन्य काही जबाबदारी टाकली जाते. आता सदस्य नोंदणीच्या कामात विद्यार्थी आणि पालकांनाही गोवण्यात आल्याची ओरड होत आहे.
काही दिवसांपूर्वी संस्थेच्या संचालकांनी दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी, प्रत्येक विद्यार्थ्यांने पैसे देऊन अथवा १०० जणांना भाजप सदस्य करावे असा फतवा काढला. जो कोणी विद्यार्थी या पद्धतीने नोंदणी करणार नाही, त्याला शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या दहावी, बारावीच्या परीक्षेसाठी बसण्यास आवश्यक ओळखपत्र दिले जाणार नाही, अशी दमदाटी करण्यात आल्याची तक्रार आहे. विद्यार्थी व पालकांवर अशा सक्तीची कारवाई करताना कोणी विरोध केल्यास घरी दाखले पाठविले जातील अशी धमकी दिल्यामुळे पालक या विषयावर फारसे बोलण्यास तयार नाहीत. संबंधितांकडून तक्रारी केल्या जात असल्या तरी आपले नाव कुठे येऊ देऊ नका, असेही ते सांगतात. दहावी आणि बारावीच्या परीक्षा तोंडावर आल्या असताना व्यवस्थापनाने अशी भूमिका घेतल्याने पालक व विद्यार्थी कात्रीत सापडले आहेत. मुलांना किंवा पालकांना सदस्य नोंदणीसाठी अभ्यास सोडून परिसरात दारोदार फिरावे लागत आहे. काहींनी शैक्षणिक नुकसान नको म्हणून आर्थिक भरुदड सहन करण्याची तयारी दर्शविली. पवननगर परिसरातील कर्मवीर भाऊसाहेब हिरे विद्यालय (केबीएच), लोकनेते व्यंकटराव हिरे विद्यालय (एलव्हीएच) आणि पंचवटी महाविद्यालयातील विद्यार्थी त्यात भरडले गेल्याचा आरोप मनसेचे जिल्हा सरचिटणीस तुषार मटाले यांनी केला. याबाबत पालकांनी मनसेच्या विद्यार्थी सेनेकडे तक्रार करीत आपली व्यथा मांडली. कारवाईच्या बडग्यामुळे पालक लेखी तक्रार देण्यास तयार नसल्याचे मटाले यांनी सांगितले. या संपूर्ण प्रकरणाची शिक्षण विभागाकडे तक्रार केली जाणार असल्याचे मनसेने म्हटले आहे. दरम्यान, संस्थेच्या कोणत्याही शाळेत या पद्धतीने भाजपची सदस्यता नोंदणी होत नसल्याचा दावा केबीएच विद्यालयाचे उपमुख्याध्यापक आर. पी. नवसारे यांनी केला आहे.