राज्य सरकारच्या ई गव्‍‌र्हनन्स योजनेनुसार तहसील कार्यालयातून मिळणारे जात, उत्पन्न, क्रीमीलेअर त्याचप्रमाणे इतर दाखले इंटरनेटवरून भरले जाणार आहेत. येत्या जून महिन्यापासून या प्रकारचे दाखले मिळण्यास सुरुवात होणार असून शासनाच्या पेपरलेस कामाच्या भाग म्हणून थेट इंटरनेटवरून दाखल्यांसाठी अर्ज करता येणार असल्याने विविध दाखल्यांसाठी पालकांना तसेच विद्यार्थ्यांना तहसील कार्यालयावर मारावे लागणारे हेलपाटेही बंद होणार आहेत. मे महिन्याची अखेर जवळ आली आहे, तर सोमवारी बारावीचा निकाल लागणार आहे. पंधरा दिवसांत शाळा, कॉलेजेस विद्यार्थ्यांनी बहरू लागतील. शाळा, कॉलेजमधील प्रवेशांसाठी सध्या विविध प्रकारचे जातीचे दाखले, उत्पन्नाचे दाखले तयार करण्याची तयारी सुरू आहे. त्यासाठी तहसील कार्यालयातील सेतू कार्यालयावर विद्यार्थी व पालकांची तुफान गर्दी जमू लागली आहे. अनेकदा कागदपत्रे नसल्याने तहसील कार्यालयात फेऱ्या माराव्या लागतात. त्याचप्रमाणे अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीसाठीही रांगा लावाव्या लागतात. या सर्वातून विद्यार्थी व पालकांची सुटका करण्यासाठी शासनाने गावागावांतून महा-ई केंद्रे सुरू केली आहेत. या महा-ई केंद्रांतून हे अर्ज भरून तेथूनच सर्व कागदपत्रे नेटवर जमा केली जाणार आहेत. ही कागदपत्रे तहसील कार्यालयात आल्यावर अधिकाऱ्यांकडून तपासल्यानंतर थेट मेलने वरिष्ठांकडे जातील व त्यांचे प्रमाणपत्र तयार होईल. यामुळे विद्यार्थ्यांना सेतूत येणे, सह्य़ा घेणे, त्यानंतर सेतूमार्फत अधिकाऱ्यांच्या सह्य़ांसाठी कागदपत्र पाठविण्यासाठी लागणार वेळ व कागद याची बचत होणार आहे. यापुढे प्रतिज्ञापत्रही थेट नेटवर करता येणार असल्याची माहिती उरण तहसीलचे नायब तहसीलदार रवींद्र पाटील यांनी दिली आहे.