शिक्षणरूपी पंख माणसाला उडण्याची ताकद प्रदान करते. या पंखांच्या भरवशावर विद्यार्थी विविध क्षेत्रात उंच भरारी मारू शकतो. पाहिलेल्या स्वप्नांना वास्तव्यात उतरवण्याची ताकदही या शिक्षणरूपी पंखात सामावलेली आहे. म्हणूनच सतत शिक्षण घेत राहा, असा संदेश भारतरत्न माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी विद्यार्थ्यांना दिला. मनोवेध सांस्कृतिक प्रतिष्ठान व खासदार हंसराज अहीर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित युवा भारत समर्थ भारत-२०२० या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.
चांदा क्लब ग्राऊंडवर आयोजित या कार्यक्रमाला शाळा, महाविद्यालयाचे विद्यार्थी, तरुण, पालक, शिक्षक व ज्येष्ठांसोबतच महिलांची अलोट गर्दी होती. यावेळी व्यासपीठावर खासदार हंसराज अहीर, माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री
शांताराम पोटदुखे, आमदार सुधीर मुनगंटीवार, आमदार नाना शामकुळे, अ‍ॅड. रवींद्र भागवत, जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर, जिल्हा पोलीस अधीक्षक राजीव जैन, मनोवेधचे प्रा.विजय बदखल उपस्थित होते.
विद्यार्थी व शिक्षकांची अलोट गर्दी बघून डॉ. कलाम यांनी भाषणाची सुरुवात माझ्या तरुण मित्रांनो या वाक्याने केली. स्वप्नाबद्दल बोलतांना म्हणाले, जी स्वप्नं तुमची झोप उडवेल, अशी स्वप्नं बघितली पाहिजे. त्या स्वप्नांचा सतत पाठपुरावा केला पाहिजे, स्वप्नांना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी प्रयत्नरत असले पाहिजे. थॉमस एल्वा एडिसन, राईट बंधु, अ‍ॅलेक्झांडर, ग्राम बेल, मॅडम क्युरी आदी दुर्मिळ अशी व्यक्तीमत्व होती. ही माणसे स्वत:च्या ध्येयासाठी सतत लढत राहिली.
अनेक प्रयत्नानंतरच त्यांना यश प्राप्त झाले. या दुर्मिळ व्यक्तीमत्वासारखे आपणही व्हावे, असे किती विद्यार्थ्यांना वाटते, असा प्रश्न विद्यार्थ्यांना करून डॉ. कलाम म्हणाले, ज्यांना असे दुर्मिळ बनायचे आहे त्यांनी सतत ज्ञान मिळवले पाहिजे, कठोर परिश्रम घेतले पाहिजे. समस्यांना कधीही न घाबरता समस्येचा हिमतीने सामना केला पाहिजे. सतत नकारात्मक बोलणाऱ्यांपासून लांब राहिले पाहिजे. ज्ञान पुस्तकातून प्राप्त होत असल्याने ग्रंथ व पुस्तकाच्या सानिध्यात राहण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांने घरात छोटेसे ग्रंथालय तयार करावे. चांगली पुस्तके माणसात सर्जनशिलता, कल्पकता व धर्य निर्माण करते. धर्यानेच माणूस आपल्या ध्येयापयर्ंत पोहोचू शकतो. धर्य माणसाला विचार करायला शिकवते. अशक्य गोष्ट शक्य करण्याची क्षमता निर्माण करते. सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी स्वत:ला एक चांगली व्यक्ती म्हणून घडवले पाहिजे. कुटुंबासाठी, समाजासाठी, जगासाठी सतत उपयोगी पडले पाहिजे. इतरांच्या आनंदात आनंद मिळवता आला पाहिजे, असा संदेशही कलाम यांनी विद्यार्थ्यांना दिला. उपस्थित शिक्षकांना मार्गदर्शन करतांना डॉ. कलाम यांनी, शिक्षकांनी आपली जबाबदारी काय, याचा विचार करावा आणि उत्तम विद्यार्थी घडवण्याचा प्रयत्न करावा, असे सांगितले. याप्रसंगी क लाम यांनी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देत त्यांच्याशी संवाद साधला. कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थिनींच्या बेटी हिन्दुस्थानी या स्वागतगीताने झाली. यावेळी कलाम यांचा खासदार अहिर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रास्ताविकही त्यांनीच केले. संचालन व आभार प्रशांत आर्वे यांनी मानले.

खा. अहीरांनी फोडला प्रचाराचा नारळ
यानिमित्ताने खासदार हंसराज अहीर यांनी अवघ्या काही महिन्यावर असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडल्याची चर्चा कार्यक्रमस्थळी होती. युवकांना भाजपकडे आकर्षित करण्यासाठी म्हणूनच डॉ.कलाम यांच्या कार्यक्रमाचे आयोजन केले गेले. त्यासाठी मनोवेध या सांस्कृतिक संस्थेचा राजकीय व्यासपीठ म्हणून अहीर यांनी अतिशय पध्दतशीर वापर करून घेतला, तसेच या शहरातील व जिल्ह्य़ातील शाळा, महाविद्यालय, कॉन्व्हेंट, अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसोबतच पालक, शिक्षक, प्राध्यापकांनाही भाजपशी जोडले. विशेष म्हणजे, हा कार्यक्रम वरवर विद्यार्थ्यांसाठी होता, असे भासविण्यात आले असले तेथील वातावरण शुध्द राजकीय कार्यक्रमासारखेच होते.

अव्यवस्था व प्रचंड गैरसोय
अलोट गर्दीमुळे आयोजकांची व्यवस्था तोकडी पडल्याने कार्यक्रमासाठी चांदा क्लब ग्राऊंडवर आलेल्या शाळकरी व महाविद्यालयीन विद्यार्थी, तरुण, पालक, शिक्षक, अतिविशिष्ट व विशिष्ट व्यक्तींना अव्यवस्था व प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागला. ग्राऊंडवर पाणी टाकलेले नसल्याने सर्वत्र प्रचंड धुळ उडत होती. यातच विद्यार्थी डॉ. कलाम यांचे विचार ऐकण्यासाठी तब्बल ११ वाजतापासून सलग चार तास उपाशीपोटी बसलेले होते. त्यांच्यासाठी पिण्याचे पाणी वा नास्त्याच्या पाकीटांचीही व्यवस्था केलेली नव्हती. मनोवेधच्या अतिउत्साही स्वयंसेवकांमुळे अनेक अतिविशिष्ट व विशिष्ट निमंत्रितांना आल्या पावली माघारी फिरावे लागले. ग्राऊंडवरील एलसीडी स्क्रीन बंद होत्या. त्यामुळे बहुतांश विद्यार्थी परत गेले. विद्यार्थ्यांसोबत आलेले पालक, शिक्षक यांना सुध्दा बसण्याची जागा नव्हती. साऊंड सिस्टम तांत्रिकदृष्टय़ा सक्षम नसल्याने विद्यार्थ्यांपर्यंत आवाज पोहोचत नव्हता. यानिमित्ताने एखाद्या कार्यक्रमाचे आयोजन कसे नसावे, हे सत्र्त्र बघायला मिळाले. ही गैरसोय आयोजकांच्याही लक्षात आली. त्यामुळे आयोजकांना सुध्दा विद्यार्थी व शिक्षकांची गैरसोय होत असल्याबद्दल माफी मागावी लागली.