तंटामुक्त मोहिमेचे सहावे वर्ष
महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेंतर्गत नंदुरबार जिल्ह्यात यंदा दिवाणी, महसुली, दखलपात्र व अदखलपात्र फौजदारी असे एकूण २,२९१ तंटे दाखल झाले असून, त्यापैकी वेगवेगळ्या प्रकारचे ३८० तंटे सामोपचाराच्या माध्यमातून मिटविण्यात यश आल्याची माहिती पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या अहवालातून पुढे आली आहे. मोहिमेच्या सुरुवातीच्या काळात तंटे मिटविण्याची प्रक्रिया सुरू झाल्यामुळे अंतिम टप्प्यात त्यात निश्चितपणे समाधानकारक वाढ होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
गावासाठी गावातच लोकसहभागातून सर्वमान्य तोडगा घडवून आणण्याची व्यवस्था निर्माण करण्याच्या उद्देशाने राज्यात महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम राबविली जात आहे. यंदा या मोहिमेचे सहावे वर्ष असून नंदुरबार जिल्ह्यातील सर्वच्या सर्व म्हणजे ५०१ गावे त्यात सहभागी झाली आहेत. या गावांमध्ये तेवढय़ाच संख्येने तंटामुक्त गाव समित्यांची स्थापनाही करण्यात आली आहे. स्थायी व समतोल विकास साधण्यासाठी समाजात शांतता व सुरक्षितता आवश्यक असते. त्याकरिता शासनाने या मोहिमेंतर्गत गावातील तंटे स्थानिक पातळीवर मिटविले जावेत आणि गावपातळीवर तंटे निर्माण होऊ नये हे प्रमुख लक्ष्य ठेवले आहे. ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीस तंटामुक्त गाव समितीची स्थापना करणे बंधनकारक आहे. गावातील तंटय़ांच्या माहितीचे संकलन, वर्गीकरण व शासनाने दिलेल्या निकषानुसार त्यांचे निराकरण करण्याची जबाबदारी या समित्यांवर सोपविली आहे. तंटे मिटविण्याच्या कामात समित्यांना स्थानिक पोलीस ठाणे, तालुका विधी सल्लागार समिती, महसूल विभागाचे अधिकारी आदींचे सहकार्य मिळते. शासनाने निश्चित केलेल्या निकषानुसार दोन्ही बाजूंचे म्हणणे जाणून घेऊन समिती ते तंटे सामोपचाराने मिटविण्याचे प्रयत्न करते.
मोहिमेच्या सहाव्या वर्षांत डिसेंबरअखेपर्यंत नाशिक परिक्षेत्रातील नंदुरबार जिल्ह्यात एकूण २२९१ तंटे दाखल झाले. त्यात दिवाणी ३७१, महसुली ६०, फौजदारी १८६० ( दखलपात्र व अदखलपात्र) तंटय़ांचा समावेश आहे. या आकडेवारीचा जिल्हावार विचार केल्यास दिवाणी व महसुली तंटय़ांच्या तुलनेत फौजदारी स्वरूपाचे खटले सर्वाधिक असल्याचे दिसून येते. त्यापैकी दिवाणी दोन, फौजदारी ३७८ असे एकूण ३८० तंटे मिटविण्यात तंटामुक्त गाव समित्यांना यश मिळाले. मिटलेल्या तंटय़ांमध्ये सर्वाधिक प्रमाण फौजदारीचे असले तरी महसुली एकही तंटा मिटू शकलेला नाही. मोहिमेतील जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यांच्या कालावधीतही या स्वरूपाचे तंटे मिटविण्याकडे समितीला लक्ष केंद्रित करावे लागणार आहे.
गावात तंटे निर्माण होऊ नयेत तसेच दाखल असलेले तंटे व नव्याने निर्माण होणारे तंटे लोकसहभागातून तडजोडीने मिटविण्यासाठी व्यवस्था निर्माण व्हावी यादृष्टीने मोहीम सुरू करण्यात आली आहे. म्हणजे, तंटामुक्त गाव समित्यांना तंटे मिटविण्यासाठी प्रयत्न करतानाच दुसरीकडे गावात नव्याने तंटे निर्माण होणार नाहीत याची दक्षता घ्यावी लागते. सामोपचाराने मिटू न शकलेल्या तंटय़ांची संख्या १,६७४ इतकी आहे. त्यात दिवाणी स्वरूपाचे ३५९, महसुली ५३ आणि फौजदारी स्वरूपाच्या २३० तंटय़ांचा समावेश असल्याचे अहवालात नमूद केले आहे.

गावातील शांततेचे वातावरण विकास प्रक्रियेला पोषक ठरत असते. ही बाब लक्षात घेऊन शासनाने ग्रामीण भागातील तंटा-बखेडय़ांचे प्रमाण कमी करण्यासाठी महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान सुरू केले आहे. या माध्यमातून स्थानिक पातळीवरील तंटे सामोपचाराने मिटविणे आणि विविध स्वरूपाचे उपक्रम राबवून ग्रामीण भागाच्या विकासाला चालना देण्याचा प्रयत्न होत आहे. या अभियानातील एकूणच कामगिरीचा वेध लेखमालेतून घेण्यात येत आहे. या मालेतील दहावा लेख.