ग्रामीण भागात ‘सोळावं वरीस धोक्याचं..’ ही प्रचलीत म्हण. किशोरवयीन टप्प्प्यावर मुला-मुलींमध्ये होणाऱ्या बदलाबाबत माहिती देण्यासाठी शिबीर, लघुपट, आरोग्य तपासणी यासह शहरी भागात विविध माध्यमे आहेत. मात्र ग्रामीण भागात आजही कुटूंबात मोकळा संवाद नाही. अत्याधुनिक तंत्रज्ञान अद्याप काही ठिकाणी पोहचलेले नाही. या परिस्थितीत शरीरातील बदलांमुळे गोंधळलेल्या किशोर वयातील मुलींना मार्गदर्शन करण्याचे काम युवा मित्रच्या ‘सुकन्या हेल्पलाईन’च्या माध्यमातून होत आहे. आजवर १०० पेक्षा अधिक मुलींनी या मदतवाहिनीचा लाभ घेतला आहे.

युवा मित्रने ‘सुकन्या-किशोरींसाठी जीवन कौशल्य’ प्रशिक्षण कार्यक्रमाची आखणी केली आहे. या माध्यमातून वयात येतांना मुलींमध्ये शारीरिक व मानसीक बदल घडून येतात. परंतु हे बदल समजून घेण्याची मुलींमध्ये जाण नसते. तसेच याविषयी शास्त्रशुध्द माहिती मिळवण्याचे माध्यमही काहींकडे उपलब्ध नाही. यामुळे अनेकदा भ्रामक समजुतीमुळे मुलींच्या बाबतीत गैरप्रकार घडत असल्याचे निदर्शनास आले आहे. परिणामी बऱ्याचदा मुलींमध्ये आत्मविश्वासाचा अभाव, आपण दुय्यमस्थानी आहोत अशी भावना निर्माण होते. किशोरवयीन मुलींना योग्य मार्गदर्शन करण्यासाठी संस्थेने अशा टप्प्यावरील मुलींसाठी खास ‘सुकन्या हेल्पलाइन’ सुरू केली आहे. जिल्ह्यातील १५ हजार किशोरींना प्रशिक्षणांतर्गत स्त्री-पुरूषांच्या शरीर रचनेतील मुख्य भेद, वयात येतांना होणारे शारीरिक व मानसिक बदल, मासिक पाळी म्हणजे काय, स्त्रीच्या आयुष्याशी असलेला संबंध, त्या दरम्यान घ्यावयाची काळजी, स्त्रित्वाशी निगडीत असलेले समाजातील गैरसमज आदींबाबत माहिती देण्यात येते. शारीरिक बदलांचा विचार होत असतांना भावनिक स्तरावर मुलींना या वयात कोणीतरी आवडायला लागते. त्यांचे कोणा एकावर प्रेम जडले आहे. या खोटय़ा समजुतीमुळे वागण्यात होणारे बदल याकडे लक्ष वेधण्यात येते. यातील चांगले तसेच वाईट परिणाम यावर चर्चा होते. परंतु बऱ्याचदा मुली याबद्दल उघडपणे बोलण्यास तयार नसतात.
स्त्री सुलभ लज्जा किंवा कोण काय म्हणेल, या अनामीक भितीपोटी आपल्या शंकांचे समाधान मुलींना करून घेता येत नाही. या पाश्र्वभूमीवर संस्थेने तीन महिन्यापूर्वी मदतवाहिनी सुरू करत यावर आपल्या शंका, अडचणी, प्रश्न बिनदिक्कत विचारण्याचे आवाहन केले. हा सारा संवाद गोपनीय राहणार असल्याने संस्थेच्या उपक्रमास जिल्ह्यातून उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला. शाळा, महाविद्यालयांमध्ये याबाबत माहिती देण्यात आली आहे. हेल्पलाइनवर आजवर १७० मुलींनी संवाद साधला. संस्थेच्या प्रकल्प समन्वयक मनिषा पोटे यांनी मुलींच्या विविध शंकांची उत्तरे दिली आहेत.
बहुतांश मुलींनी शारीरिक व मानसीक बदलांविषयी विचारणा केली. आरोग्य, आहार यासह मासिक पाळी याबाबत आपल्या शंका विचारल्या आहेत. तसेच, माझे एका मुलावर प्रेम आहे. पण घरच्यांना ते पसंत नाही, काय करू, अशी विचारणा करणारेही दूरध्वनी आले. मुलींची भावनीक स्थिती लक्षात घेता तिला आवश्यक आधार, विश्वास तिला एका कॉलच्या माध्यमातून मिळू शकत नाही. तिला समूपदेशन करण्यासाठी संस्थेत बोलविण्यात येते. यासाठी गरज पडल्यास तिची येण्या-जाण्याची व्यवस्थाही करण्यात येते. दोन-तीन बैठकीत जर प्रश्न सुटला नाही तर, गृहभेटीच्या माध्यमातून कुटुंबियांशी संवाद साधला जातो. आईला विश्वासात घेत परिस्थितीची कल्पना देत पुढील धोके, तिच्याशी असणारी घरच्यांची वर्तवणूक आदींकडे लक्ष वेधतांना तिच्यासाठी आश्वासक वातावरण निर्मितीवर भर दिला जातो. यामुळे अनेक मुलींनी आत्मविश्वासाने धोक्याचे वळण सुरक्षितपणे ओलांडत आपल्या भविष्याकडे पाऊल टाकण्यास सुरूवात केली आहे. याविषयी पोटे यांनी माहिती दिली. आई आणि मुलगी यांच्यात मनमोकळा संवाद झाला तर अडचण उद्भवणार नाही. बऱ्याचदा मुलींमध्ये आईला प्रश्न विचारण्यासाठी भीती तर आईला मुलीला कसे सांगायचे ही शंकांची वृत्ती असल्याने संवाद घडत नाही. यामुळे हेल्पलाइन पालक आणि मुली या दोघांना मार्गदर्शक ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मदतवाहिनीची मदत घ्या..
किशोरींना कोणत्याही शंका, अडचणींसाठी ‘सुकन्या हेल्पलाइन’ची मदत घेता येईल.
या संदर्भात अधिक माहितीसाठी ७७२०८३४८३४ किंवा http://www.esuknya.com संकेतस्थळावर संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेने केले आहे.