संस्कृती आणि कलेची परंपरा जोपासना करणाऱ्या नवी मुंबईकरिता भूषणवह ठरले आहे ते सिडकोने उभारलेले सीबीडी येथील अर्बनहाट. सध्या अर्बनहाटमध्ये समर फेस्टिव्हलला सुरुवात झाली असून नागरिकांची खरेदीसाठी झुंबड उडाली आहे.
समर फेस्टिव्हलमध्ये भारताच्या कानाकोपऱ्यातील कलाकारांनी घडवलेल्या कलाकृती, शिल्पकला, हातमाग, हस्तकला दाखल झाल्या आहे. ग्राहकांना कलात्मक व गृहोपयोगी साहित्यांमध्ये लागणाऱ्या वस्तूही या ठिकाणी उपलब्ध आहेत. महिलांसाठी हातमागावरील साडय़ा, पंजाबी ड्रेस, ओढणी, चादर, बेडशीट, कार्पेट या ठिकाणी उपलब्ध आहेत म् महिला बचत गटाच्या माध्यमातून बनविलेल्या घरगुती खाद्य, मालवणी कोल्हापुरी, कोकणी अशा विविध शाकाहारी तसेच मांसाहारी खमंग आणि चमचमीत खाद्यपदार्थाची मेजवानी ठेवण्यात आली आहे. जांभूळ पावडर, आवळा पावडर, मालवणी वडे विक्रीसाठी ठेवण्यात आले आहे.  
समर फेस्टिव्हलचा विशेष आकर्षण ठरला तो देवगडचा हापूस आंबा. यंदा अर्बनहाटमध्ये दर्जेदार हापूस दाखल झाला असून २०० ते २५० रुपयांना मिळत आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ यांच्या सहकार्यातून विदर्भातील तांदूळ विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत. ६० रुपये किलोने तांदूळ विकले जात असून तांदूळ घेण्याकडे गृहिणींची मोठय़ा प्रमाणात कल असल्याचे विक्रेते सुजितकुमार देखमुख यांनी सांगितले.
महाराष्ट्र, मध्य प्रदेश, ओडिसा, आंध्र प्रदेश, झारखंड, बंगाल, उत्तर  प्रदेश, कर्नाटक, राजस्थान, छत्तीसगड, बंगाल अशा १८ राज्यांतून कारागीरांनी व व्यापाऱ्यांनी हस्तकलेच्या माध्यमातून तयार केलेल्या बांबूंचे फर्निचर, लाकडी हस्तकलेच्या वस्तू मेळाव्यामध्ये उपलब्ध आहेत म् वारली पेंटिगने बनविलेल्या वस्तू ५ रुपयांपासून २५ रुपयांपर्यंतच्या विक्रीसाठी उपलब्ध असून टी शर्ट, मोबाइल कवर, ग्रीटिंग कार्ड, भेटवस्तू यांसारख्या वस्तूंवर केलेली वारली पेंटिंग तरुणांना आकर्षित करीत असल्याचे वारली पेंटिंग विक्रेते उज्ज्वला भट्टे यांनी सांगितले. त्याचबरोबर राजस्थानी, मधुबनी, पटचित्र विक्रीसाठी उपलब्ध आहेत.  गवतापासून बनविलेल्या चिमण्यांची घरटी, घरे, प्राणी, पक्षी हे मेळाव्यातील आकर्षण बनले आहे. लाकडी, स्टील आदीपासून बनविलेल्या आकर्षक नकली दागिन्यांच्या बांगडय़ा, कर्णफुले, माळा, हिऱ्याचे सेट आदी ज्वेलरी या ठिकाणी उपलब्ध आहेत म् बचत गटाद्वारे बनवण्यात आलेल्या कोकण आणि मालवणी नारळ, आंबे, काजू, पापड, लोणचे तसेच आयुर्वेदिक वनस्पतीदेखील उपलब्ध आहेत म्
मणिपूर येथील हस्तकलेच्या माध्यमातून बनवलेल्या वस्तूदेखील विक्रीसाठी उपलब्ध आहेत. प्रत्येक शनिवारी आणि रविवारी ज्ञानरंजनाचा खजिना असणारा माहितीपट, सांगीतिक कार्यक्रमांचा आस्वाद रसिकांना समर फेस्टिव्हलमध्ये घेता येईल.