विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झालेले आणि या निवडणुकीत दारुण पराभव पत्करावा लागलेले मालेगाव विकास आघाडीचे नगरसेवक सुनील गायकवाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला तडकाफडकी सोडचिठ्ठी दिली आहे. नाशिकचे माजी पालकमंत्री आमदार छगन भुजबळ यांचे थेट नाव न घेता विजयाची भरपूर संधी असताना पक्षनेतृत्वाने विरोधी पक्षाला अनुकूल होईल अशी भूमिका घेतल्यामुळेच आपला पराभव झाल्याचा आरोप करीत या निवडणुकीत आपला बळी देण्याचा उद्योग झाल्याची भावना गायकवाड यांनी येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केली. दरम्यान, गायकवाड यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांवर केलेले आरोप बिनबुडाचे असून त्यात तथ्य नसल्याचे जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पगार यांनी म्हटले आहे.
गायकवाड यांनी स्थापन केलेल्या मालेगाव विकास आघाडीचे चार नगरसेवक महापालिकेत आहेत. गेल्या महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश झाल्यानंतर त्यांना मालेगाव बाह्य मतदारसंघात पक्षाने उमेदवारी दिली होती. या निवडणुकीत सेनेचे आमदार दादा भुसे हे विजयी झाले असून गायकवाड हे तिसऱ्या स्थानावर फेकले गेले. या पराभवाचे खापर त्यांनी पक्षनेतृत्वावर फोडले. पक्षनेतृत्वाची विरोधी उमेदवाराबद्दल असलेली सलगी त्यास कारणीभूत असल्याची टीका गायकवाड यांनी केली. आपल्याला उमेदवारी देताना पक्षाची पूर्ण ताकद पाठीमागे उभी केली जाईल अशी हमी देण्यात आली होती; परंतु या हमीप्रमाणे कोणतेही पाठबळ दिले गेले नाही. निवडणूक निधीदेखील दिला गेला नाही. किरकोळ अपवाद सोडले तर पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आपल्याला मदत करण्याऐवजी विरोधी उमेदवारांना साथ दिली. विजयाची पूर्ण संधी असताना शेवटच्या दोन दिवसांत विरोधी उमेदवाराला अनुकूल होईल असे धोरण पक्षनेतृत्वाने घेतल्यामुळेच आपणास पराभूत व्हावे लागल्याचा आरोप गायकवाड यांनी केला. केवळ कोणाचे तरी भले व्हावे या उद्देशाने बळी देण्यासाठी आपल्याला राष्ट्रवादीची उमेदवारी दिली गेली आणि त्यातून आपल्याला दगाबाजी सहन करावी लागली. स्वपक्षीय उमेदवाराशी अशा प्रकारे पक्षनेतृत्व गद्दारी करीत असेल तर अशा पक्षात काम करण्यास स्वारस्यदेखील नसल्यामुळे आपण सोडचिठ्ठी देत असल्याचे गायकवाड यांनी स्पष्ट केले. आमदार दादा भुसे यांच्याविरोधात मतदारसंघात भरपूर नाराजी आहे. अशा वेळी पक्षाने योग्य ती ताकद दिली असती तर त्यांचा पराभव करणे शक्य होते असा दावा करीत आगामी काळात आमदारांच्या दहशतीविरोधात तसेच तालुक्यातील विकासकामांमध्ये झालेल्या गैरकारभारांविरोधात आपण सातत्याने लढा देऊ, असा निर्धार गायकवाड यांनी या वेळी बोलून दाखवला.