महापालिकेत एका ठेकेदाराकडून पाच लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडले गेल्यामुळे निलंबित झालेले कल्याण डोंबिवली महापालिकेचे कार्यकारी अभियंता सुनील जोशी महापालिकेच्या सेवेत पुन्हा दाखल होताच लाचखोरीच्या प्रकरणात आरोपी असलेल्या त्यांच्या पत्नी अनिता जोशी यांच्या डोंबिवलीतील चोळे भागातील बंगल्याच्या बांधकामाला नगररचना विभागाने लागलीच हिरवा कंदील दाखविल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. सुनील जोशी यांना सेवेत घेण्यासाठी महापालिकेच्या निलंबन आढावा समितीच्या दोन महिन्यांपूर्वी बैठका सुरू होताच या बंगल्याच्या कामाच्या विटाही एकावर एक चढू लागल्याची खमंग चर्चा महापालिका वर्तुळात रंगू लागली आहे. महापालिकेच्या नगरविकास विभागाने मात्र जोशी यांना सेवेत घेण्याचा आणि बंगल्याच्या बांधकामास परवानगी देण्याचा काहीएक संबंध नसल्याचे म्हटले आहे. 

लाचखोरीच्या प्रतापांमुळे साडेतीन वर्षांहून अधिक काळ निलंबित राहिल्याने जोशी सेवेत नव्हते. दीड महिन्यांपूर्वी महापालिका प्रशासनाने कौशल्य पणाला लावून त्यांची ‘अकार्यकारी’ अभियंता पदावर पुन्हा वर्णी लावली आहे. सुनील जोशी यांना लाच घेताना पकडल्यानंतर त्यांची पत्नी अनिता यांच्यासह इतर २५ हून अधिक आरोपींवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बेहिशेबी मालमत्ता जमा केल्याप्रकरणी गुन्हे दाखल केले. बेहिशेबी मालमत्तेचे प्रकरण एकीकडे चौकशीच्या फेऱ्यात सापडले असताना चोळे गावातील भूखंडावर उभा राहाणारा हा नवा बंगला चर्चेत आला आहे. या बंगल्याच्या बांधकामास परवानगी देताना अनिता जोशी यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, न्यायालय, शासनाचा नगरविकास विभाग, पालिका सर्वसाधारण सभा यांची परवानगी घेतली आहे का असे प्रश्न उपस्थित केले जात असून लाच लुचपत प्रतिबंधक विभागानेही याप्रकरणी माहिती घेण्यास सुरुवात केली आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

हाकेच्या अंतरावर नवीन बंगला
चोळे गावातील भूखंड क्रमांक ४२ येथे सुमारे २६५ चौरस मीटर क्षेत्रफळाच्या भूखंडावर दोन माळ्याचा बंगला उभारण्यात येत आहे. ‘सेंट्रल रेल्वे मेन्स वेअर हाऊसिंग’ सोसायटीच्या जागेत हा भूखंड आहे. या भागात महापालिकेचे विकास आराखडय़ातील रस्ते नाहीत. तरीही महापालिकेने या बांधकामाला परवानगी दिली आहे. योगेश जोशी यांची या भूखंडात भागीदारी आहे. ‘एमआयडीसी’तील समर्थ स्मृती या जोशी यांचे सध्याचे वास्तव्य असलेल्या बंगल्यापासून हाकेच्या अंतरावर नवीन बंगला उभारण्यात येत आहे. वास्तुशिल्पकार धनश्री भोसले यांनी फेब्रुवारीमध्ये या बांधकामासाठी महापालिकेकडून अंतरिम बांधकाम मंजुरी घेतली आहे.
छाननी करून परवानगी दिली – नगररचनाकार
महापालिकेचे नगररचनाकार सुभाष पाटील यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी मौजे चोळे येथील एका भूखंडावर बांधकाम करण्यासाठी अनिता जोशी यांचा प्रस्ताव त्यांच्या वास्तुविशारदातर्फे आला होता, असे स्पष्ट केले. कागदपत्रांची पडताळणी करून त्या बांधकामाला परवानगी देण्यात आली आहे, असेही पाटील यांनी स्पष्ट केले. परवानगी योग्य पद्धतीने मागण्यात आली आहे का, याची चाचपणी करण्यात आली. त्यानंतरच बांधकाम परवानगी देण्यात आली, असे पाटील यांनी स्पष्ट केले. दरम्यान, सुनील जोशी व इतर आरोपींवर न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. आता जे बांधकाम सुरू करण्यात आले आहे. ती जागा वादग्रस्त प्रकरणातील आहे का याची प्रथम चाचपणी करावी लागेल, अशी माहिती ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने वृत्तान्तला दिली. या प्रकरणी सुनील जोशी यांच्या कार्यालयात आणि त्यांच्या मोबाइलवर वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न करूनही तो होऊ शकला नाही.