भारत इ.स. २०२० पर्यंत महाशक्ती बनेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. परंतु विज्ञान व तंत्रज्ञानाशिवाय सुपर ‘पॉवर’चे स्वप्न अशक्य आहे. त्यामुळे विज्ञान आणि तंत्रज्ञान या क्षेत्रात विविध संशोधन करण्याची आवश्यकता आहे, असे मत केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंह यांनी व्यक्त केले.
विज्ञान भारतीच्या पहिल्या राष्ट्रीय अधिवेशनाचे शनिवारी आयटी पार्कमधील पर्सिस्टन्ट कंपनीच्या सभागृहात जितेंद्र सिंह यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून विज्ञान भारतीचे अध्यक्ष डॉ. विजय भटकर, मार्गदर्शक सुरेश सोनी, महापौर प्रा. अनिल सोले, माधवन नायर, जय कुमार, के. वाय. वासू, जयंत सहस्त्रबुद्धे प्रामुख्याने उपस्थित होते. जितेंद्र सिंह पुढे म्हणाले, वैज्ञानिक प्रगतीसोबतच संस्कृती व मूल्यांचीही जोपासना झाली पाहिजे. त्यासाठी समाज व संस्कृतीमध्ये समन्वय साधण्याची गरज आहे. गेल्या काही वर्षांत भारताने विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात प्रगती केली. मात्र त्यासोबतच मनुष्य हा भावनिकरीत्या एक दुसऱ्यापासून दुरावत चालला आहे. आज कोणताही पालक आपल्या मुलाला संशोधक बनवू इच्छित नाही. तो केवळ आयआयटीमध्ये पाठविण्याचे स्वप्न पाहू लागला आहे. समाजाची ही मानसिकता बदलवण्याची अत्यंत आवश्यकता असल्याचेही ते यावेळी म्हणाले.
सध्या देशात प्रमुख ३८ प्रयोगशाळांसह विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक संस्था आहेत. मात्र यापैकी अनेक संस्थामधील प्रमुख पदे रिक्त आहेत. ही रिक्त पदे लवकरच भरली जातील. अर्थसंकल्पात विज्ञान व तंत्रज्ञानासाठी विशेष वाढ करण्यात येणार असल्याची घोषणाही सिंह यांनी याप्रसंगी केली. यावेळी दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशनाच्या उद्घाटन समारंभाचे औचित्य साधून पाहुण्यांच्या हस्ते विज्ञान भारतीच्या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी जितेंद्र सिंग यांच्या हस्ते व्हीएनआयटीचे माजी संचालक डॉ. रामभाऊ तुपकरी, प्रा. घोष व डॉ. कुंटे यांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. डॉ. भटकर यांनी प्रास्ताविकातून विज्ञानाचे महत्त्व स्पष्ट करून विज्ञान भारतीतर्फे राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली.