आरोग्य, शिक्षण आणि अंधश्रद्धा निर्मूलनाविषयी शासन तसेच विविध सामाजिक संस्थांच्या वतीने राबविल्या जात असलेल्या लोककल्याणकारी योजनांना खीळ घालण्यात महत्त्वाची भूमिका बजाविणाऱ्या भोंदू भगतांचा ठाणे, पालघर या मुंबईलगतच्या दोन जिल्ह्य़ांमध्ये अक्षरश: सुळसुळाट आहे. जिल्हा प्रशासनाने अलीकडेच केलेल्या एका सर्वेक्षणात ठाणे आणि पालघरमध्ये तब्बल सोळाशे एक भोंदू भगत आढळून आले आहेत. या भोंदू भगतांचा बंदोबस्त केल्याशिवाय कोणतीही लोककल्याणकारी योजना यशस्वी होऊ शकणार नाही, या निष्कर्षांप्रत प्रशासन आले आहे.   
मुंबईलगत असूनही ठाणे आणि पालघर या दोन्ही जिल्ह्य़ांचा ग्रामीण भाग विकास योजनांपासून अद्याप खूप दूर आहे. दारिद्रय़ आणि कुपोषणाच्या दुष्टचक्रात अडकलेल्या या जनतेचे स्थानिक भोंदूबाबा पद्धतशीरपणे शोषण करतात. ‘देवाचा कोप होईल’ अशी भीती घालून भगत ग्रामीण जनतेला सरकारी दवाखान्यात जाण्यापासून परावृत्त करतात. या भगतांच्या प्रभावामुळेच स्थानिक खेडुत आधुनिक आरोग्य सेवा नाकारीत असल्याचा शासकीय कर्मचारी तसेच स्वयंसेवी संस्थांचा अनुभव आहे. त्यामुळे या दोन्ही जिल्ह्य़ांत नेमके भगत किती याचा शोध घेण्यासाठी प्रशासनाने एक सर्वेक्षण मोहीम राबवली. त्यात तब्बल १६०१ भगत आढळून आले असून त्यांची नावानिशी नोंद घेण्यात आली आहे.
रोगापेक्षा इलाज भयंकर
दोन्ही जिल्ह्य़ांच्या ग्रामीण भागात आरोग्य सुविधांची वानवा आहे. दुर्गम भागात चांगले डॉक्टर्स दुर्लभ आहेत. या परिस्थितीचा गैरफायदा भोंदू भगतांनी घेतला असून ‘गाव तिथे भगत’ अशी परिस्थिती आहे. स्वत:ला भेडसाविणाऱ्या प्रत्येक समस्येवर भगताकडे उपाय असतो, या अंधश्रद्धेचा ग्रामीण जनतेवर जबरदस्त पगडा आहे. विशेषत: नव्याने अस्तित्वात आलेल्या पालघर जिल्ह्य़ात भगतांची संख्या लक्षणीय आहे. पालघरमधील विक्रमगड तालुक्यात २६४, जव्हारमध्ये-२६२, डहाणूमध्ये २२१, तलासरीमध्ये २१३ तर मोखाडय़ामध्ये ११७ भगत आहेत. भगतांनी सांगितलेले अनेक उपाय हे रोगापेक्षा इलाज भयंकर स्वरूपाचे असतात. त्याने झाला तर अपायच होतो, पण ईश्वरी कोपाच्या भयाने ग्रामस्थ ते सहन करतात. आईचे दूध हे मुलासाठी सर्वात पोषक अन्न असते. मात्र भगताच्या प्रभावामुळे ग्रामीण माता पहिले काही दिवस मुलास दूध न पाजून कुपोषणास निमंत्रण देतात. शारीरिक आजारांवर गोळ्या-औषधे घेण्याऐवजी भगताकरवी अंगावर चटका लावून घेण्यासारखे आघोरी उपाय सहन करतात. 

मूळ दुखणे दूर करण्याचा प्रयत्न
कार्यशाळेच्या माध्यमातून भगतांना विश्वासात घेण्याची, तसेच त्यांच्याशी संवाद साधण्याची एक योजना विचाराधीन असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण भावसार यांनी वृत्तान्तशी बोलताना दिली. मूळ दुखणे दूर करण्याचा हा प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यासाठी दोन्ही जिल्ह्य़ांच्या आदिवासी विभागात कार्यशाळा भरविण्याची एक योजना आखली आहे. त्यात राजमाता जिजाऊ अभियान तसेच इतर तज्ज्ञांकरवी भगतांचे प्रबोधन केले जाणार आहे.