गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा तडाखा वाढत असून शहरातील काही व्यस्त्यांमध्ये पाण्यासाठी नागरिकांना वणवण भटकावे लागत आहे, तर दुसरीकडे काही वस्त्यांमध्ये पाण्याचा यथेच्छ वापर करून नासाडी केली जात असल्याचे चित्र शहरात दिसून येत आहे.
राज्यातील विविध भागात दुष्काळी परिस्थितीत नागपूर महापालिका आणि ऑरेंज सिटी वॉटर वर्क्‍सने जुलै महिन्यापर्यंत पाणी पुरेल इतका पाणी साठा उपलब्ध आहे, असा दावा केला असताना जसजसा उन्हाचा तडाखा वाढत आहे तशी काही वस्त्यांमध्ये पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. विशेषत: उत्तर, पूर्व, दक्षिण आणि पश्चिम नागपुरातील अनधिकृत वस्त्यांमध्ये पाण्याचा तुडवडा असून लोकांना त्यासाठी वणवण हिंडावे लागत आहे. तर दुसरीकडे शहरातील काही भागात पाण्याचा साठा असल्यामुळे त्याची नासाडी केली जात आहे. विशेषत: दुचाकी व चार चाकी गाडी धुण्यासाठी, कुलरमध्ये, पाणपोई केंद्रावर आणि अंगणात सडा टाकण्यासाठी पाण्याचा यथेच्छ वापर केला जात असून याकडे मात्र कोणाचे लक्ष नाही. उन्हाळ्यामध्ये कुलरमध्ये पिण्याचे पाणी टाकले जात आहे.
शहरातील अनेक भागातील नळांना तोटय़ा नाही तर काही ठिकाणी पाईप लाईन लिकेज आहे. नुकतेच मध्य नागपुरातील एका वस्तीमध्ये गडर लाईन फुटल्यामुळे नागरिकांना गढूळ पाणी मिळत होते. शहरातील विविध भागात ऑरेंज सिटी वॉटर वर्क्‍सचे काम सुरू असल्यामुळे लिकेजेस दुरुस्त करण्याचे काम सुरू आहे. महापालिकेतर्फे उभारण्यात येणाऱ्या दहा ते बारा पाण्याच्या टाक्याचे मार्चपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित असताना ते अर्धवट झाले आहे. त्यामुळे लोकांना पाण्याच्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. फुटलेल्या पाईप लाईनमधून पाण्याची मोठय़ा प्रमाणात नासाडी होत आहे. स्वतला सुशिक्षित समजणारे अनेक उच्चवर्गीय लोक घरात किंवा व्यापारी प्रतिष्ठानामध्ये गाडय़ा धुण्यासाठी किंवा घरातील अंगण स्वच्छ करण्यासाठी पाण्याचा यथेच्छ वापर करीत असतात. काही घरांमध्ये रोज पाण्याचा साठा केल्यानंतर दुसऱ्या दिवशी ते शिळे झाले म्हणून ते फेकून देण्याचा प्रकार पाहावयास मिळतो. एकीकडे काही वस्त्यामध्ये पाण्याचा अपव्यय होत असताना काही वस्त्यांमध्ये पाणी मिळत नसल्याने शहरात गंभीर परिस्थिती उद्भवली आहे.
उत्तर, मध्य आणि दक्षिण पश्चिम भागातील अनेक वस्त्यांमध्ये घराघरातील नळाला पाणी येत नसल्याच्या तक्रारी आहेत. विहिरी आटल्या, बोअरवेलही नादुरुस्त अवस्थेत आहे. अशावेळी दोन गुंड पाणी मिळविण्यासाठी सकाळी ६ वाजेपासून भटकंती सुरू होते.
घरी नळ असूनही मुख्य पाईपलाईन फोडून अनधिकृतपणे पाणी घेतले जात आहे.  तक्षशिलानगर, मयुरनगर, कडू ले-आऊट, बाबादीपनगर, दीपकनगर, मैत्री कॉलनी, समतानगर या भागात जलवाहिन्या नाहीत. येथील नागरिक विहिरींच्या पाण्यावर अवलंबून आहेत. मात्र विहिरीचेही पाणी आता खोल गेले आहे. मे महिन्यात सुरुवातीला पाण्याची समस्या निर्माण झाली असताना येणारे दिवस या भागातील नागरिकांसाठी आणखी कठीण जाणार आहे.
पश्चिम नागपुरातील जयताळा, गावंडे लेआऊट आदी वस्त्यांमध्ये दोन दिवसाआड पाणीपुरवठा होत असून टँकरही वेळेवर येत नसल्याने नागरिकांवर भटकंतीची वेळ आली आहे. उत्तर नागपुरातील अनेक वस्त्यांमध्ये नळाला पाणी नसल्याने नागरिक टँकरची मागणी करतात. मात्र अनेक टँकर नादुरुस्त असल्याचे कारण सांगतात त्यामुळे  टँकर येईलच याची शाश्वती नसते. वसाहतीतील अनेक बोअरवेलही नादुरुस्त आहेत. ज्या बोअरवेलला पाणी आहे त्यावर पहाटे ५ वाजेपासून रांगा लागतात. शहरातील काही वस्त्यामध्ये मुबलक पाणी पुरवठा होत असला तरी काही वस्त्यामध्ये नागरिकांना पाणी समस्येला सामोरे जावे लागत आहे. शहरात होत असलेला पाण्याचा अपव्यय टाळला तर पाण्यासाठी वणवण फिरणाऱ्या लोकांना वाया जाणारे पाणी मिळू शकेल.

नागपूर जिल्ह्य़ात सर्वत्र पाणी टंचाई असताना ९२ गावांना दूषित पाणीपुरवठा होत असल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. मार्च महिन्यात १३ तालुक्यांमधील २२९८ पाण्याचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत आले होते. त्यापैकी ९२ गावांमध्ये दूषित पाणीपुरवठा होत असल्याचे तपासणी दरम्यान उघडकीला आले. हिंगणा तालुक्यातील सर्वाधिक १५ गावांचा समावेश आहे. पाण्यात २० टक्क्यांपेक्षा कमी क्लोरिनची मात्रा असलेले एकूण २६ नमुने आढळून आले. याशिवाय जिल्ह्य़ातील नागपूर तालुक्यात २ पाणी नमुने दूषित आढळून आले. तसेच मौदा १३, कुही ६, सावनेर ५, भिवापूर ३, कळमेश्वर १, पारशिवनी १२, उमरेड ६, कामठी १०, रामटेक७, नरखेड ६, हिंगणा १५, देवलापार ६ आदींसह एकूण ९२ गावांचा समावेश आहे.

Pillow and sleeping
Pillow and sleeping : झोपताना पायामध्ये उशी ठेवल्यास महिलांना आरोग्यासाठी मिळतील ‘हे’ फायदे
multi color grapes export demand decline at global level
निर्यातीसाठी रंगीत द्राक्षांना मागणी घटली; जाणून घ्या कारणे काय ?
Citizens of Dombivli suffering because of bad roads Excavation of roads for laying of new roads and channels
खराब रस्त्यांमुळे डोंबिवलीतील नागरिक हैराण; नवीन रस्ते, वाहिन्या टाकण्याच्या कामांसाठी रस्ते खोदाई
Infrastructure boosts real estate sector
पायाभूत सुविधांमुळे रिअल इस्टेट क्षेत्राला चालना