नागपूर-कळमेश्वरच्या ग्रामीण वातावरणात प्रादेशिकतेचा बाज घेऊन उल्हास डांगोरे यांची भोगराग ही कादंबरी बेतली आहे. रुकमी या पात्राभोवती कथानक फिरत असताना कृषीजन्य रुढीप्रिय संस्कृतीचा वारसा जतन करून अठराविश्वे दारिद्रय़ाच्या महासूर्यात रोज कितीतरी कुटुंबे जळत आहे, हे वास्तव येथे उभे राहते. रुकमीची सासू आनंदीबाई, सासरा वामनराव, नवरा सीताराम, दीर माणिक, नणंद चंद्रभागा, मुलगी कुमुद, मुलगा भागवत या कुटुंबाभोवती कथानक फिरताना दिसून येते. गावगाडय़ातील प्रेमजिव्हाळा, शेजारची भांडणे, करणीकवटालाचा संशय आणि परित्यक्ता स्त्रीचे जगणे अतिशय कसबदार पद्धतीने चित्रित  झाले आहे. सुखदु:खात हे कुटुंब माणसामाणसांमधील जिव्हाळा जतन करताना दिसून येते. सीतारामच्या मृत्यूचा प्रसंग ह्रदय पिळवटून टाकणारा आहे.
या कादंबरीची सुरुवात सुखवस्तू, मध्यंतर दु:खार्तता करणारा, तर शेवट आशादायी आहे. रुकमीचा संघर्ष मात्र काही केल्या संपत नाही. रुकमी सीतारामच्या मोलमजुरीतून या कुटुंबाचा उदर निर्वाह चालतो. सीतारामच्या मृत्यूनंतर त्यांचे वडील वामनराव म्हातारपणातही जीवनाशी झुंज देतात. ते हतबल नाहीत, तर परिस्थितीशी दोन हात करीत आपल्या सुनेच्या पाठीशी ठाम उभे राहिले, हा आशावाद प्रेरणा देणारा आहे. सीतारामचा भाऊ माणिक लग्नानंतर गावाला येणेही बंद करतो. कुमुदचा शिक्षणासाठी गावोगाव, नातलगाकडे राहण्याचा संघर्ष, नवव्या वर्गात असताना होणारे लग्न, जबाबदारी झटकणारा माणिक, राजकारण व पाटर्य़ापायी बर्बाद होणारा नथुराम, भांडखोर बाजीराव, सुनेवर माया करणारी सासू आनंदीबाई व भाडय़ाचे पैसे मागणारा रामदास, ही पात्रे चित्रित करताना रुकमी व वामनरावांच्या गरिबीची फरफट कशी होते व वामनरावांचा परिस्थितीशी होणारा पराभव वारंवार चित्रीत होतो.
उल्हास डांगोरे हे नाव वाचकांच्या परिचयाचे आहे. एक आयुष्य, आत्ममग्न, पडदा अशी पुस्तके त्यांच्या नावावर जमा आहेत. भोगराग ही प्रस्तुत कादंबरी होय. यात कथानक सशक्त, हळवे आहे, मात्र त्यांची बांधणी व्यवस्थित झाली नाही. ती रुकमी या पात्राभोवती, तिच्या कष्टाभोवती गुरफटली आहे. कथानकात तुटलेपणा जाणवते. अनेकदा एकाच ठिकाणी कथानक रेंगाळते. भोगराग हा अस्सल प्रादेशिक बाज नाही. प्रमाणभाषा व प्रादेशिकता यात डांगोरे मेळ घालू शकले नाही. जसे गोधन रानात फिरून आले, वैरण, गोमाता हे शब्द बोलीभाषेत गुदमरतात. कधी कादंबरीकार गोमाता, वैरण म्हणतो, कधी गाय, कडबा म्हणतो, हा साहचर्य भावाचा अभाव जाणवतो. नागपुरी बोली, वऱ्हाडी, झाडीपट्टी, तर कधी कोल्हापुरी बोलीचाही प्रभाव कादंबरीकारावर असल्याचे दिसून येते. पृ. १०१ मध्ये नाथुरामचा मृत्यू होतो तर पुढे पृ. १९३ मध्ये तो जिवंत कसा होतो़ भोंडं कपाळ घेऊन कुठं चालली रुकमे? हा संवाद लक्षणीय आहे.
कादंबरीत १०१ प्रश्नांची मालिका त्यांनी जोडली आहे. हे लक्षणीय आहे. २०५ पृष्ठांची ही कादंबरी वत्सल क्रिएशन सांस्कृतिक मंडळ, नागपूर यांनी प्रकाशित केली आहे. या कादंबरीची किंमत २२५ रुपये आहे. दु:खाच्या वाळवंटात सुखाचे रोपटे लावणाऱ्या तमाम कष्टकरी समाजाचा उद्घोष करणारी ही कथा वाचकांना नक्कीच अंतर्मुख करणारी आहे. वैदर्भीय बोलीभाषेचे उत्कृष्ट वान म्हणून उल्हास डांगोरे यांच्या कांदबरीचे वाचकांनी स्वागत करावे.