पुण्यातील माळीण येथे डोंगर खचल्याने झालेल्या भीषण दुर्घटनेच्या पाश्र्वभूमीवर, नाशिक जिल्ह्यातील डोंगरदऱ्यांमध्ये धोकादायक ठिकाणी वसलेली गावे आणि पाडय़ांच्या सर्वेक्षणाचे निर्देश जिल्हा प्रशासनाने दिले असून अशा सर्व भागांत अधिक सतर्कता बाळगण्याचे सूचित करण्यात आले आहे. पुण्याची घटना होईपर्यंत जिल्हा प्रशासन या ठिकाणांविषयी अनभिज्ञ असल्याचे उघड झाले आहे. सह्याद्रीच्या रांगेत वसलेल्या नाशिक जिल्ह्यातील बहुतांश भागात सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. कसारा घाटात मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्ग तसेच मध्य रेल्वेच्या मार्गावर दरड कोसळण्याच्या घटना घडल्या. इतरही काही ठिकाणी या स्वरूपाच्या घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे डोंगराच्या पायथ्याशी, डोंगरदऱ्यांमध्ये वसलेली गावे व पाडय़ांची संख्या मोठी असल्याने त्यांचे सर्वेक्षण करतानाच उपरोक्त भागात वास्तव्यास असलेल्या नागरिकांना सावध केले जाणार आहे.
पावसाच्या जलधारा पुणे जिल्ह्यातील माळीण गावावर काळ बनून आल्या. भलामोठा ढिगारा गावावर कोसळल्याने संपूर्ण गाव क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले. या घटनेनंतर खडबडून जाग आलेल्या शासनाने डोंगरपायथा अन् दऱ्याखोऱ्यांमध्ये वसलेल्या गावांमधील ग्रामस्थांना स्थलांतरित करण्याची सूचना केली आहे. पुण्याची दुर्घटना घडेपर्यंत शासन व जिल्हा प्रशासनाने अशी आपत्ती कोसळू शकते, याचा विचार केला नसल्याचे लक्षात येते. सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या नाशिक जिल्ह्यातील बहुतांश भाग डोंगरदऱ्यांनी व्यापलेला आहे. त्यात प्रामुख्याने इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, सुरगाणा, पेठ, सटाणा या पाच तालुक्यांचा समावेश होतो. उपरोक्त भागांत मागील सहा ते सात दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. इगतपुरी तालुक्यातील कसारा घाटात मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्ग तसेच इगतपुरी-कसारादरम्यानच्या रेल्वे मार्गावर दरड कोसळण्याची घटना घडली. यामुळे कित्येक तास रस्ते व रेल्वे वाहतूक ठप्प झाली. डोंगराच्या पायथ्याशी आणि दऱ्याखोऱ्यांत वसलेली गावे व पाडय़ांची संख्या कमी नाही. या ठिकाणी पावसात धोकादायक स्थिती निर्माण होऊ शकते, याचा जिल्हा प्रशासनाच्या पातळीवर गांभीर्याने विचार सुरू झाला आहे. ब्रह्मगिरी, नील पर्वत, टाके हर्ष व इतर डोंगरांच्या कुशीत वसलेले त्र्यंबकेश्वर गाव हे त्याच धाटणीचे. इगतपुरी व त्र्यंबक तालुक्यात अशी गावे व पाडय़ांची संख्या बरीच मोठी आहे. सुरगाणा, पेठ व सटाणा तालुक्यांत यापेक्षा वेगळी स्थिती नाही. डोंगराच्या मूळ रचनेला धक्का बसल्यानंतर दरड कोसळण्याची घटना घडते. वृक्षतोड, अनियमित बांधकामे आणि पवनचक्क्या ही प्रामुख्याने माती ठिसूळ होण्याची कारणे असून त्यामुळे पावसाळ्यात दरड कोसळण्याचे प्रमाण वाढत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. पुण्यातील दुर्घटनेमुळे आता जिल्ह्यात अशा धोकादायक ठिकाणी वसलेली गावे व पाडय़ांच्या सर्वेक्षणाचे निर्देश देण्यात आल्याचे जिल्हाधिकारी विलास पाटील यांनी सांगितले. आजपर्यंत या स्वरूपाचे सर्वेक्षण झाले नसल्याची बाबही त्यांनी मान्य केली. अनेक ठिकाणी या स्वरूपाचा धोका असू शकतो. यामुळे अशा भागांची छाननी करून स्थानिक ग्रामस्थांना सतर्क केले जात असल्याचे पाटील यांनी नमूद केले.
ग्रामीण भागातील गावे व पाडय़ांच्या स्थितीचे अवलोकन करून गरज भासल्यास तेथील नागरिकांना सुरक्षित स्थळी नेण्याची तयारी जिल्हा प्रशासनाने केली आहे.
काझीगढी भागात काही घरे जमीनदोस्त
गोदावरी काठालगतच्या काझीगढी या पावसाने धोकादायक झालेल्या भागात गुरुवारी काही घरे जमीनदोस्त झाली. या ठिकाणी कोणी वास्तव्यास नसल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. संततधारेमुळे या ठिकाणी माती खचण्याची शक्यता निर्माण झाली होती. यामुळे धोकादायक बनलेल्या घरात नागरिकांनी वास्तव्य करू नये, असे आवाहन अग्निशमन विभागाने केले आहे. आदल्या दिवशी उपरोक्त परिसराची अग्निशमन दलाच्या जवानांनी पाहणी केली. आसपासच्या नागरिकांना सतर्क राहण्याची सूचना दिली. गुरुवारी कोणी वास्तव्यास नसलेल्या तीन ते चार घरांच्या भिंती धसल्याचे सांगण्यात आले.