सूर्यापासून मिळणाऱ्या प्रचंड सौरऊर्जेचा वापर दैनंदिनी गरजा भागवण्यासाठी करता आला तर कोळसा, तेल आणि गॅससारख्या ऊर्जास्रोतांवर येणारा अतिरिक्त भार टाळता जाऊ शकतो. सौरऊर्जेच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी भाईंदर येथील केशवसृष्टी संस्थेने आणि प्रा. राजेंद्र सिंग ऊर्जा अभियानामार्फत मागील वर्षांपासून ‘सूर्यकुंभ’ हा उपक्रम राबवण्यात आला होता. या उपक्रमाला अधिक व्यापक स्वरूप मिळावे, या उद्देशाने ‘महासूर्यकुंभ’ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. १५ ते २५ जानेवारी दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवामध्ये मुंबई, ठाण्यातील विविध शाळा, महाविद्यालयांतील सुमारे २५ हजार विद्यार्थी सहभागी होणार आहेत. ठाण्यामध्ये पर्यावरण दक्षता मंच यांच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
जळगावचे विवेक काबरा मुंबई आयआयटीमध्ये कार्यरत असून सौरऊर्जेवरील संशोधनातून त्यांनी सौरचुलीची निर्मिती केली आहे. वापर केल्यानंतर गुंडाळून (फोिल्डग) ठेवू शकू, अशी सौरचूल त्यांनी निर्माण केली आहे. अत्यंत कमी खर्चामध्ये तयार झालेल्या या सौर चुलीचे पेटंटही त्यांच्या नावे नोंदवण्यात आले आहे. शालेय विद्यार्थ्यांना सौर चुलीचा वापर करता यावा आणि सौरचुलीचा वापर वाढवण्याच्या दृष्टीने केशवसृष्टी संस्थेने सौरकुंभ उपक्रमाचे आयोजन केले होते. मुंबई, ठाण्यातील सुमारे ३ हजार ५४९ विद्यार्थी या उपक्रमात सहभागी झाले होते. एशिया बुक, लिम्का बुक आणि गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड यामध्ये या उपक्रमांची नोंद घेण्यात आली होती. यंदा हा उपक्रम अधिक व्यापक करण्यात आला असून महासूर्यकुंभ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने ठाणे पर्यावरण दक्षता मंच जिल्ह्य़ातील ठाणे, डोंबिवली, कल्याण, टिटवाळा, बदलापूर, अंबरनाथ, कल्याण ग्रामीण आणि मुरबाड ग्रामीण या भागांतील विद्यार्थाशी संपर्क करून त्यांना या उपक्रमात सहभागी करून घेण्यात येत आहे.

ठाणे जिल्ह्य़ातील ग्रामीण भागामधील विद्यार्थ्यांपर्यंत सौरचुलीसारखे उपक्रम पोहचू शकलेले नाही. त्यामुळे या भागातील विद्यार्थाना मोफत सूर्यचूल उपलब्ध करून त्यावर जेवण बनवण्याची संधी देण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये प्रामुख्याने हा उपक्रम राबवण्यात येत असला तरी खाजगी संस्था आणि शाळाही या उपक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद देत आहेत.
भरत गोडांबे, पर्यावरण दक्षता मंच

सौरऊर्जेचा उपयोग वाढण्यासाठी हा उपक्रम उत्तरोत्तर वाढवण्यात येणार आहे.
जगदीश पाटील, प्रबंधक, केशवसृष्टी संस्था.