पाण्याअभावी मोसंबीच्या जळालेल्या बागांसाठी मराठवाडय़ातील शेतकऱ्यांनी दोन लाख रुपये मदतीची मागणी केली असताना सरकारने एकरी केवळ ३ हजार १०० रुपये नुकसानभरपाई देण्याचे ठरविले. मात्र, या निर्णयाविरोधात शेतकऱ्यांमध्ये संतप्त सूर उमटला. त्यातूनच शुक्रवारी संतप्त मोसंबीउत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या मोसंबीच्या बागा जाळून सरकारचा निषेध केला.
दरम्यान, औरंगाबाद जिल्ह्य़ातील सांजखेडा गावात खमर खान या शेतकऱ्याच्या मोसंबी बागेचीही जाहीर होळी करण्यात येणार आहे.
या शेतकऱ्याच्या डोक्यावर १७ लाखांचे कर्ज असून, सरकारने शेतकऱ्यांबाबत संवेदनशीलता दाखवून या मदतीचा फेरविचार करावा, असे आवाहन मोसंबी उत्पादक संघटनेचे अध्यक्ष जयाजीराव सूर्यवंशी यांनी केले आहे. या वर्षी दुष्काळामुळे मराठवाडय़ातील अडीच लाख एकर क्षेत्रातील मोसंबी बाग जळून गेली. कित्येक हजार कोटींचा फटका शेतकऱ्यांना यातून बसला आहे.
 प्रत्येक वर्षी मोसंबीच्या पैशांमुळे शेतकऱ्यांच्या मुला-मुलींची लग्ने होत होती, मुलांचे शिक्षण सुरू होते, घरे बांधली जात होती. या बरोबरच  मोसंबी पिकावर अनेक बागवान व मजूर अवलंबून होते. परंतु सरकारने मोसंबी बागा वाचविण्यासाठी कुठल्याही प्रकारची मदत न केल्यामुळे ९० टक्के मोसंबीच्या बागा जळून गेल्याचा आरोप त्यांनी केला. सरकारने शेतकऱ्यांना केवळ ३ हजार १०० रुपयांची मदत देऊन त्यांचा अपमान करू नये. आम्हाला तुमची मदत नको, अशी म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. दुष्काळी दौरे थांबवा. विधानसभेत चुकून शेतकऱ्यांसाठी तोंड उघडा, एवढीच शेतकऱ्यांची अपेक्षा असल्याचे सूर्यवंशी यांनी म्हटले आहे.
सरकारने जळालेल्या मोसंबी बागांना एकरी दोन लाखांची मदत द्यावी, कापूस उत्पादकांना हेक्टरी २५ हजार रुपये नुकसानभरपाई द्यावी. या मागण्यांकडे सरकारने लक्ष न दिल्यास प्रत्येक जिल्ह्य़ात मोसंबीबागेची होळी करून सरकारचा निषेध केला जाईल व मे महिन्यात मंत्रालयावर बोंबाबोंब मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा खमर खान, दीपक जोशी, भगवान पवार आदींनी दिला.