स्वाईन फ्लूच्या चाचणीसाठी आवश्यक असलेले वैद्यकीय साहित्य मोफत उपलब्ध करणे परवडत नसल्यामुळे प्रशासनाने आता खासगी रुग्णालयांतून पालिकेच्या रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांकडून त्यासाठी चार हजार रुपये घेण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतच्या प्रस्तावास आरोग्य समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. स्वाईन फ्लू झालेल्या रुग्णांची पालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात ‘एच १ एन१’ची चाचणी केली जाते. या चाचणीसाठी लागणारे वैद्यकीय साहित्य महाग असल्यामुळे त्याचा खर्च करणे महापालिकेला परवडत नाही. खासगी रुग्णालयांमध्ये या साहित्यासाठी रुग्णांकडून पाच हजार रुपये घेतले जातात. मात्र ही चाचणी पालिकेच्या रुग्णालयांमध्ये विनाशुल्क करण्यात येत होती. परंतु आरोग्य विभागाला आर्थिक भार सहन होत नसल्यामुळे खासगी रुग्णालयांमधून ही चाचणी करण्यासाठी पालिका रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांकडून चार हजार रुपये घेण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.