मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाचे गेल्या दीड ते दोन वर्षांपासून बंद पडलेले ताडदेव ग्रंथसंग्रहालय अखेर सुरू झाले आहे. ‘लोटस महाल’ या नव्या इमारतीत ग्रंथ संग्रहालयाला हक्काची जागा मिळाली आहे. ‘मुंबई वृत्तान्त’ने यासंदर्भात सातत्याने पाठपुरावा केला होता.ग्रॅण्टरोड (पश्चिम), चिखलवाडी, जहांगीर हाजी अली गल्ली येथे हे वाचनालय होते. हे ग्रंथालय असलेली इमारत महापालिकेने धोकायदायक म्हणून घोषित केल्यानंतर महापाकिकेकडून ग्रंथालयाला टाळे ठोकण्यात आले होते. या ठिकाणापासून जवळच महापालिकेने पुनर्विकासाअंतर्गत बांधण्यात आलेल्या ‘लोटस महाल’मध्ये ग्रंथालयासाठी जागा राखून ठेवण्यात आली होती. मात्र या जागेत महापालिकेच्या विकास आणि नियोजन विभागाने आपले बस्तान बसवले होते.हे ग्रंथालय सुरू होण्यासाठी जागरूक ग्रंथप्रेमी, ग्रंथालयाचे सदस्य यांना बरोबर घेऊन मुंबई नागरिक केंद्राने सातत्याने पाठपुरावा केला होता. काही दिवसांपूर्वी महापालिका मुख्यालयात संबंधित अधिकाऱ्यांबरोबर झालेल्या बैठकीत ‘लोटस महाल’मधून नियोजन आणि विकास विभागाचे बस्तान हलविण्याचे आश्वासनही देण्यात आले होते.
त्यानंतर पुन्हा एकदा मुंबई नागरिक केंद्राने हे ग्रंथालय सुरू होण्यासाठी नेटाने प्रयत्न केले आणि अखेर नुकतेच हे ग्रंथालय सुरू झाले. ग्रंथालयाच्या ज्येष्ठ सभासदांच्या हस्ते ग्रंथालयाचे अनौपचारिक उद्घाटन करण्यात आले.
दरम्यान, ग्रंथप्रेमी आणि सभासदांच्या प्रयत्नातून आम्ही केलेल्या पाठपुराव्याला यश आले आणि बंद पडलेले हे ग्रंथालय सुरू झाले. साहित्यप्रेमी आणि चोखंदळ वाचकांनी मोठय़ा संख्येने ग्रंथालयाचे सभासद व्हावे, असे आवाहन मुंबई नागरिक केंद्राचे पदाधिकारी नंदकिशोर साळवी यांनी ‘वृत्तान्त’शी बोलताना केले. या ठिकाणी विभागातील विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका सुरू करण्याचा विचार असल्याचेही साळवी म्हणाले.