शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या नागपूर दौऱ्यात औरंगाबादच्या कन्नड मतदारसंघाचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी एका पोलीस निरीक्षकाला केलेल्या मारहानीचा महाराष्ट्र सेवानिवृत्त पोलीस अधिकारी कल्याणकारी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी निषेध केला. आमदार जाधव यांच्यावर कारवाई करून त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात यावे, या मागणीसाठी माजी पोलीस अधिकाऱ्यांनी व्हेरायटी चौकात धरणे देऊन सरकारचे लक्ष वेधले.
उद्धव ठाकरे तीन दिवसांपूर्वी मंत्री, आमदार आणि विदर्भातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधण्यासाठी आले होते. बैठकीनंतर ते हॉटेल प्राईडमधील एका खोलीत थांबले असताना त्यांना भेटण्यासाठी आमदार हर्षवर्धन जाधव आले. मात्र, त्यांना पराग जाधव या पोलीस निरीक्षकांनी शिवसेना नेत्यांच्या आदेशाप्रमाणे आत जाऊ दिले नाही. त्यामुळे संतापलेल्या आमदार जाधव यांनी पराग जाधव यांच्या कानशिलात लगावली. या घटनेचे पडसाद उमटल्यावर विधानभवनात अनेक आमदारांनी त्याचा निषेध केला. एका पोलीस अधिकाऱ्याला सेवेत असताना लोकप्रतिनिधींनी मारहाण करणे हे लोकशाहीला काळिमा फासणारे आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांनी व्यक्त केली.
हर्षवर्धन जाधव या घटनेनंतर नागपूर सोडून मुंबईला रवाना झाले. दरम्यान, पराग जाधव यांच्यामागे महाराष्ट्र सेवानिवृत्त पोलीस अधिकारी ठाम उभे राहिले आणि त्यांनी आज व्हेरायटी चौकात आमदार हर्षवर्धन जाधव यांच्यावर ‘मोका’ लावण्यात यावा, अशी मागणी केली. पोलीस अधिकाऱ्याला लोकप्रतिनिधीने मारहाण करणे म्हणजे पोलिसांचे मनोबल खच्चीकरणाचा हा प्रयत्न आहे. उद्धव ठाकरे हॉटेलमधील खोलीत थांबलेले असताना कोणालाही आत सोडू नका असे आदेश शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी पराग जाधव यांना  दिलेला असताना त्यांनी आपले कर्तव्य पार पाडले होते. जोपर्यंत हर्षवर्धन जाधव यांच्यावर कारवाई होत नाही आणि त्यांचे सदस्यत्व रद्द होत नाही तोपर्यंत सेवानिवृत्त पोलीस अधिकारी आंदोलन करीत राहणार आहेत.
या संदर्भात माजी पोलीस अधिकारी अनिल बोबडे यांनी सांगितले, कायदेशीर कार्यवाही करणाऱ्या अधिकाऱ्यास जनतेच्या प्रतिनिधींनी मारहाण करणे ही बाब लज्जास्पद असून असे वागणे आमदाराचे की एखाद्या गुंडाचे आहे हे समजण्यापलीकडे आहे. पोलिसांची अशी कुठलीही संघटना नसल्यामुळे सर्व सेवानिवृत्त पोलीस अधिकारी एकत्र येऊन या विरोधात आवाज उठवणार आहेत.  अशा घटनामुळे पोलिसांचे मनोबल कमी होते त्यामुळे आमदार जाधव यांचे विधानसभा सदस्यत्व रद्द करून त्यांची चौकशी करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. एम. ए. अजीज, एस. एच. महाजन, सुरेश महाले, एम.बी. आतराम, मुकुंद लांबे, प्रभाकर धोटे, अनिल बोबडे, ए.ए, पठाण हर्षसिंग साबळे इत्यादी माजी पोलीस अधिकारी उपस्थित होते.

आमदार हर्षवर्धन जाधव यांनी पोलीस अधिकाऱ्याला मारहाण केल्यानंतर दोन दिवसांनी नागपूराला विधिमंडळाच्या अधिवेशनासाठी आले. मात्र. झालेल्या प्रकाराबद्दल मला काही बोलायचे नाही, असा पवित्रा घेत त्यांनी प्रसार माध्यमांना टाळण्याचा प्रयत्न केला. शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन आलो असून झालेल्या घटनेबद्दल त्यांची माफी मागितली, त्यामुळे या विषयावर बोलणार नाही. सभागृहात लक्षवेधी असल्यामुळे मला सभागृहात जाणे आवश्यक आहे,  असे सांगून जाधवांनी परिसरातील शिवसेना कार्यालयातून पळ काढला.