मनसेचे पालिका आयुक्तांना आवाहन
मांसाहारींना सदनिका विकण्यास नकार देणाऱ्या विकासकावर कारवाई करण्याबाबत भाजपवगळता इतर सर्व पक्षांच्या नगरसेवकांनी एकमताने मंजूर केलेल्या ठरावाच्या सूचनेवर तातडीने निर्णय घ्यावा, असे साकडे मनसेने पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांना घातले आहे. विकासकांची पाठराखण करणाऱ्यांकडून दबाव येण्याची शक्यता असल्याची शंका मनसेने पालिका आयुक्तांना सादर केलेल्या पत्रात व्यक्त केली आहे.
आपल्या टॉवरमधील सदनिका मांसाहारींना विकण्यास नकार देणाऱ्या विकासकांना जुनी इमारत पाडण्यासाठी दिली जाणारी परवानगी (आयओडी) आणि काम सुरू करण्यासाठी दिले जाणारे प्रमाणपत्र (सीसी) रद्द करण्याची मागणी मनसेचे गटनेते संदीप देशपांडे यांनी पालिका सभागृहात ठरावाच्या सूचनेद्वारे केली होती. या ठरावाच्या सूचनेस शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पार्टीने पाठिंबा दिला होता. मात्र विकासकांची पाठराखण करीत भाजप नगरसेवक या ठरावाच्या सूचनेस कडाडून विरोध करीत होते. अखेर भाजपला एकटे पाडून इतर सर्व पक्षांच्या नगरसेवकांनी बहुमताने ही ठरावाची सूचना मंजूर केली.
सर्वोच्च न्यायालयाच्या एका निकालाचा दाखला देत समविचारी व्यक्ती एकत्र राहू शकतात, असा युक्तिवाद भाजपचे नगरसेवक करीत आहेत. मात्र समविचारी आणि समआहारी यामध्ये फरक आहे. तसेच राज्यात भाजपचे सरकार असल्यामुळे पालिका सभागृहात बहुमताने मंजूर झालेली ही ठरावाची सूचना बाद करण्यासाठी प्रशासनावर दबाव येण्याची शक्यता आहे. त्यामुळे कुणाच्याही दबावाला बळी न पडता आयुक्तांनी मांसाहारींना सदनिकांपासून वंचित ठेवणाऱ्या विकासकांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचा निर्णय घ्यावा, असे आवाहन संदीप देशपांडे यांनी आपल्या पत्रात केले आहे.