०  अ‍ॅड. देवेंद्र यादव व दिवाकद दळवी यांचा आरोप
०  निवडणूक प्रक्रियेत विश्वस्तांनी हस्तक्षेप करण्याची विनंती
नाटय़ परिषदेची निवडणूक प्रक्रिया, मतदारांपर्यंत मतपत्रिका न पोहोचणे, त्यावरून चाललेले आरोप प्रत्यारोप या सर्वाना गेल्या दहा वर्षांतील ‘टकले-जोशी’ मंडळींचा कारभार जबाबदार असल्याची टीका नाटय़ परिषदेचे कायदेविषयक सल्लागार व स्वीकृत सदस्य अ‍ॅड. देवेंद्र यादव आणि दिवाकर दळवी यांनी केली.
   या निवडणुकीत हरणारे कोणतेही पॅनल पुढे उच्च न्यायालयात या निवडीला आव्हान देणार आहे. त्यामुळे नाटय़ परिषदेचा पुढील वेळ, पैसा आणि श्रम वाचवण्यासाठी नाटय़ परिषदेच्या विश्वस्तांनीच या प्रक्रियेत हस्तक्षेप करावा, असे विनंतीवजा आवाहन या दोघांनी केले          आहे.
परिषदेच्या मुंबई विभागातील ६०४९ मतदारांपैकी अनेकांपर्यंत मतपत्रिका पोहोचणेच शक्य नाही. यापैकी अनेक मतदार दुसऱ्या पत्त्यावर राहायला गेले आहेत, तर काही हयात नाहीत. अशा मतदारांची नावे आणि पत्ते अद्ययावत करणे ही नाटय़ परिषदेची जबाबदारी होती. मात्र नाटय़ परिषदेने हे केलेले नाही, असा आक्षेप या दोघांनी घेतला.
नाटय़ परिषदेची निवडणूक ही गुप्त मतदान पद्धतीने घ्यावी, अशी घटनादुरुस्ती आम्ही केली होती. मोहन जोशी यांनीही त्याबाबत आग्रह धरला होता. मात्र सध्या या निवडणूक प्रक्रियेवर झोड उठवणाऱ्यांनीच त्या वेळी घटनादुरुस्ती नियमबाह्य असल्याचा कांगावा केला, असे दळवी यांनी सांगितले.
सध्या निवडणूक प्रक्रियेत होणारे आरोप-प्रत्यारोप पाहता कोणीही निवडून आले, तरी पराजित पक्ष उच्च न्यायालयात धाव घेऊन हरकत नोंदवणार अशीच चिन्हे आहेत. त्यामुळे पुनर्निवडणूक घेण्याऐवजी ही प्रक्रिया सुरू असतानाच विश्वस्तांनी यात हस्तक्षेप करणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.