आजच्या संगणकीय आणि यंत्रयुगात मानव सगळी कामे करण्यास तत्पर असतानाही सायकल रिक्षा विदर्भासह काही राज्यात आजही अस्तित्वात आहे. अशा सायकल रिक्षाचालकांचे जीवन किती हालअपेष्टांनी भरलेले असते, त्यांच्या जीवनात किती यातना असतात यासारख्या अनेक प्रश्नांचा आढावा घेणारा ‘तानी’ या नव्या चित्रपटाची निर्मिती उपराजधानीत होत आहे. यात प्रमुख भूमिका ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक आणि कलावंत अरुण नलावडे यांची आहे.
मूळचे नागपूरकर मात्र गेल्या अनेक वर्षांंपासून मुंबईत स्थायिक झालेले संजीव कोलते या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार असून त्यांनीच कथा, पटकथा संवाद, गीते लिहिली आहेत. या चित्रपटाबाबत बोलताना संजीव कोलते यांनी सांगितले. सायकल रिक्षाचालकाच्या जीवनावर हा चित्रपट असून त्याचे वास्तव जीवन यातून दाखविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. फुटाळा तलाव, रामदासपेठ, लेंड्रा पार्क झोपडपट्टी, बडकस चौक, गांधीगेट, इतवारी रेल्वेस्टेशन आदी भागात चित्रीकरण करण्यात येणार आहे. फुटाळा तलाव परिसरात चित्रपटाचा सेट उभारण्यात आला असून या ठिकाणी जवळपास १७ दिवस चित्रीकरण करण्यात येणार आहे. ‘श्वास’सारखा चित्रपट ऑस्कपर्यंत पोहोचवूनही जमिनीवर राहून काम करणारे अरुण नलावडे यांचा नेहमीच नावीन्यपूर्ण भूमिका करण्यात नावलौकिक आहे. सायकल रिक्षाचालकाच्या भूमिकेत या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. ‘तानी’ची कथा एका रिक्षा चालक आणि त्याच्या मुलीभोवती गुंफण्यात आली आहे. दारिद्रय़ात राहून सायकल रिक्षा चालवून उदरनिर्वाह करणाऱ्या सायकल रिक्षाचालकाला स्वत:च्या मुलीला शिकवण्यासाठी कशा प्रकारच्या संकटांना सामोरे जावे लागते याचे चित्रण ‘तानी’मध्ये करण्यात आले आहे. चित्रपटाचे निर्माते अजय ठाकूर आणि वंदना पतके-ठाकूर आहेत. यात ‘तानी’ची भूमिका केतकी माटेगावकर करणार आहे. या चित्रपटात सर्व स्थानिक कलावंतांना स्थान देण्यात आले असून त्यातील काही मुंबईत स्थायिक झाले आहे तर काही नागपुरात आहेत. अभिनेते नाना उजवणे, डॉ. गिरीश ओक, ज्येष्ठ नाटय़ दिग्दर्शक आणि कलावंत मदन गडकरी, वत्सला पोलकमवार-आंबोणे, देवेंद्र दोडके, मधू जोशी, ईला भाटे, बालकलावंत वेदिका वाईरगडे ही कलावंत मंडळी यात काम करणार आहेत. कॅमेऱ्याची बाजू राजा फडतरे यांनी तर कला दिग्दर्शकाची बाजू नाना मिसाळ यांनी सांभाळली आहे. हा चित्रपट मुंबईला करता आला असता मात्र रिक्षाचालकाचे खरे वास्तव हे विदर्भात नागपूरशिवाय कुठेच नाही. आजच्या यंत्रयुगात सायकल रिक्षाचालकांची संख्या कमी झाली असली तरी ती विदर्भात टिकून आहे. त्यामुळे नागपुरात चित्रीकरण करण्याचा विचार केला. चित्रपटात वऱ्हाडी भाषेचा उपयोग करण्यात आला आहे. साधारणत: एप्रिल किंवा मे पर्यंत हा चित्रपट पूर्ण झाल्यानंतर प्रथम आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी पाठविला जाणार आहे. त्यानंतर या चित्रपटाचा प्रिमियर शो  नागपुरातच करण्यात येणार असल्याचे कोलते यांनी सांगितले.
रिक्षात बसून आरामात पाहिजे त्या ठिकाणी जाणे जितके सोपे आहे, तितकेच रिक्षा चालविणे किती कठीण आहे हे या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या निमित्ताने समजले. गेल्या दोन दिवसांपासून रोज दोन तास रिक्षा चालविण्याचा सराव करीत असल्याचे अभिनेते अरुण नलावडे यांनी सांगितले. ‘श्वास’नंतर ‘तानी’ हा माझ्या आयुष्यातील दर्जेदार चित्रपट म्हणून समोर येणार असल्याचा विश्वास आहे. चित्रपटातील वऱ्हाडी भाषा आत्मसात करणे माझ्यासमोर मोठे आव्हान आहे. या चित्रपटात सर्व स्थानिक कलावंतांना संधी देण्यात आली असून त्यांच्यासोबत मला काम करण्याची संधी मिळणार आहे. विमलाश्रमचे प्रमुख राम इंगोले यांच्या जीवनावरील चित्रपट फेब्रुवारीमध्ये प्रदर्शित करणार असल्याचे नलावडे यांनी सांगितले.

vasai, virar, palghar, lok sabha election 2024, Hitendra Thakur
सर्व पक्षांनी मलाच पाठिंबा द्यावा, हितेंद्र ठाकूर यांची चित्रफित प्रसारित
The Kerala Story triggering political drama in Kerala In Loksabha Polls 2024
‘द केरला स्टोरी’चा राजकीय आखाड्यात प्रवेश; केरळमधील वातावरण तापले; वाचा नक्की काय आहे प्रकरण!
lokrang, shekhar rajeshirke, documentary making, journey, for, nature documentaries, family contribution,
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: माहितीपटांचा गृहोद्योग…
gaanewali program at tarun tejankit
सक्षम भविष्याचे स्वप्न सत्यात उतरवणाऱ्या प्रज्ञेचा सन्मान