‘चीनमध्ये अस्तित्वात येणारे आभासी (व्हच्र्युअल) चलन, इंटरनेटच्या मदतीने कोरियामध्ये आयोजित करण्यात आलेले ‘फ्लॅश मॉब्ज’ आणि आफ्रिकेसारख्या मागास खंडामध्येही रुळत चाललेले ‘कॅशलेस ट्रॅन्झ्ॉक्शन’मार्फतचे दैनंदिन व्यवहार.. या साऱ्यांनी आपले भविष्य बदललेले असेल.. आणि येणाऱ्या काळात जगातील इंटरनेटच्या सर्व व्यवहारांवर पगडा असेल तो भारत, चीन आणि ब्राझिलमधील संस्कृतीचा..’ भविष्याचा हा असाच वेगळा लक्ष्यवेध ऐकायला मिळणार आहे तो नासकॉमच्या बुधवारपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनामध्ये.
नासकॉमचे अधिवेशन म्हणजे माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील भविष्याचा वेध असेच काहीसे समीकरण आहे. गेल्या अनेक अधिवेशनांमधून तसे ते सिद्धही झाले आहे. आपल्यापैकी प्रत्येकाला एक वेगळी डिजिटल ओळख असेल आणि आयुष्यातील सर्व व्यवहार त्या विशेष क्रमांकाला जोडले जातील. मग बँक खाते उघडण्यापासून ते इतर सर्व बाबींपर्यंत तुम्हाला त्याचाच आधार घ्यावा लागेल.. सुमारे १५ वर्षांपूर्वी नासकॉमच्या अधिवेशनात आलेल्या एका भविष्यवेत्त्याने ‘फ्युचरॉलॉजिस्ट’ने केलेले हे विधान आज भारतात आपल्याला प्रत्यक्षात आलेले दिसते. आपल्या क्रेडिट कार्डापासून ते शर्ट- पँटपर्यंत आरएफआयडी कसे कार्यरत असेल, त्याची कल्पना डॉन टॉपस्कॉट या फ्युचरॉलॉजिस्टने सात वर्षांंपूर्वी दिली होती. आज ती व्यवहारात उतरली आहे.
या पाश्र्वभूमीवर आता यंदाच्या ‘नासकॉम २०१३’च्या ‘लक्ष्य.. भविष्यवेध’साठीची उत्सुकता चाळवली गेली आहे. यंदा माइक वॉल्श हा फ्युचरॉलॉजिस्ट या अधिवेशनामध्ये येणार आहे. माइक जगात प्रसिद्ध आहे तो, जगाला प्रसंगी अडचणीच्या वाटणाऱ्या अशा तंत्रज्ञानातूनच जगाचा भावी चेहरामोहरा कसा आकारास येणार आहे, ते सांगण्यासाठी. त्याचे म्हणणेच असे आहे की, यापुढचे जगाचे भवितव्य हे (सुरुवातीला) अडचणीच्या वाटणाऱ्या (पण नंतर त्याच्यावरच सगळे व्यवहार अवलंबून राहणाऱ्या ) किंवा तुमचे व्यवहार विस्कळीत करणाऱ्या अशा तंत्रज्ञानामध्ये (डिसरप्टिव्ह टेक्नॉलॉजी) दडलेले असेल. याचा प्रामुख्याने संबंध असेल तो चीन, भारत आणि ब्राझीलशी. या देशांतील संस्कृतीचा प्रभावही येणाऱ्या काळात प्रथम इंटरनेटवर आणि त्यानंतर प्रत्यक्षातही जगभरात पाहायला मिळेल.. पण हे सारे नेमके होणार कसे, ते सोदाहरण ऐकण्याची उत्सुकता आता चाळवली गेली असून त्यासाठीच बुधवारी होणाऱ्या त्याच्या सादरीकरणाकडे आता साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे!