टाटा वीज कंपनीच्या वीज पुरवठय़ाच्या परवान्याच्या नूतनीकरणास बेस्ट उपक्रमाने राज्य वीज नियामक आयोगापुढे (एमईआरसी) झालेल्या सुनावणीत आक्षेप घेतला. सर्वोच्च न्यायालयात टाटा वीज कंपनीविरुद्ध दाखल केलेल्या खटल्याचा दाखलाही यावेळी बेस्टने दिला.टाटा वीज कंपनीच्या विद्युतपुरवठय़ाच्या परवान्याची मुदत ऑगस्टमध्ये संपुष्टात येत आहे. त्यामुळे टाटा कंपनीच्या परवान्याचे नूतनीकरणाची प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र त्यास स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून बेस्ट उपक्रमाने आक्षेप घेतला आहे. राज्य वीज नियामक आयोगापुढे याबाबत मंगळवारी सुनावणी झाली. या सुनावणी दरम्यान बेस्ट उपक्रमाने आपली बाजू मांडली.
आपल्या कार्यक्षेत्रामध्ये टाटा वीज कंपनी विद्युतपुरवठा करू शकत नाही, असा आक्षेप घेत बेस्टने यापूर्वीच सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. सर्वोच्च न्यायालयाने ‘जैसे थे’ ठेवण्याचे आदेश दिले आहेत. ही बाबही बेस्ट उपक्रमाने राज्य वीज नियामक आयोगापुढे मांडली.