नागरिकांवर लादण्यात येणाऱ्या मालमत्तासह तीन वाढीव कराचा प्रस्ताव गेल्या सभेत मंजूर करण्यात आल्यानंतर हा प्रस्ताव रद्द करण्यात यावा, अशी मागणी करीत विरोधकांनी सभागृहात गोंधळ घातला. विरोधकांच्या गोंधळात पटलावर असलेले विषय मंजूर करण्यात आले.
उन्हाळ्यात पाण्याची भीषण समस्या असताना दरवाढीचा प्रस्ताव एकमताने नाही तर बहुमताने मंजूर करण्यात झाला अशी नोंद इतिवृत्तात करण्यात यावी, अशी मागणी करीत सत्तापक्षाने तो बदल करावा असे विरोधकांनी सूचविले. इतिवृत्त बदलण्याची नामुष्की प्रशासनावर दुसऱ्यांदा आली असून महापौर प्रवीण दटके यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. विरोधी पक्ष नेते विकास ठाकरे यांनी इतिवृत्तात असलेला एकमताने हा शब्द वगळावा, अशी मागणी केली त्यावर सत्तापक्ष नेते दयाशंकर तिवारी यांनी एकमताने हा शब्द वगळून तो विरोधकांच्या विरोधामुळे बहुमताने मंजूर झाला, अशी नोंद इतिवृत्तामध्ये करण्यात येण्यासंबंधी प्रशासनाला सूचना केली आणि प्रशासनावर दुसऱ्यांदा इतिवृत्तामध्ये बदल नामुष्की आली. यापूर्वी तीन अभियंत्यांच्या नियुक्तीच्या इतिवृत्ताची नोंद मागे घेण्यात आली होती.
करवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांवर भार वाढणार असल्यामुळे ती रद्द करण्यात यावी अशी भूमिका काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि बसपाने यापूर्वी केली होती. त्यामुळे हा करवाढीचा प्रस्ताव प्रथम रद्द करावा, अशी मागणी विरोधी पक्षाचे नेते विकास ठाकरे यांनी केली. मात्र, सत्ता पक्षाला ते मान्य नसल्यामुळे त्यांनी प्रश्नोत्तराच्या तासाला सुरुवात करण्याचे निर्देश दिले. विरोधकांना ते मान्य नसल्यामुळे त्यांनी सभागृहात महापौरांच्या आसनासमोर घोषणा देणे सुरू केले. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक प्रकाश गजभिये यांनी करवाढीवर चर्चा करावी, अशी मागणी केली, महापौरांनी त्याला संमती दिली नाही त्यामुळे राष्ट्रवादीच्या सदस्यांनी बहिष्कार टाकला. आधी वाढीव कर प्रणाली प्रस्ताव रद्द करण्यात यावा, अशी मागणी करीत घोषणा दिल्या. जोपर्यंत वाढीव कर रद्द करण्यात येणार नाही तोपयर्ंत सभागृह चालू देणार नाही, असा इशारा देत विरोधकांनी सत्तापक्षाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू केली. या घोषणा आणि गोंधळात दहा मिानिटांसाठी सभा तहकूब करण्यात आली. दरम्यान विरोधी पक्षांनी महापौरांच्या आसनासमोर ठाण मांडले होते. दहा मिनिटानंतर सभा सुरू होताच पुन्हा विरोधी पक्षाच्या सदस्यांनी घोषणा देणे सुरू केले आणि या गोंधळातच पटलावर असलेले सर्व विषय एकमताने मंजूर केले आणि अनिश्चित काळासाठी सभा तहकूब करण्यात आली.
यावेळी विकास ठाकरे म्हणाले, मालमत्ताकरासह इतर करामध्ये करण्यात आलेली वाढ विरोधी पक्षाला मान्य नसताना त्यांनी इतिवृत्तामध्ये एकमताने नोंद कशी केली. महापालिका सचिवांनी कुठल्या आधारावर ती नोंद केली आहे त्याची चौकशी झाली पाहिजे. करवाढ मंजूर नसल्यामुळे त्या विरोधात आमची लढाई सुरूच राहणार आहे. महापौर सभागृहाची दिशाभूल करीत असून त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी ठाकरे यांनी केली. राज्यात भाजपचे सरकार असल्यामुळे आणि मुख्यमंत्री नागपूरचे असल्यामुळे ते सहज शक्य आहे. सत्तापक्षाच्या सदस्यांची मानसिकता नाही. जनतेला अनेक आश्वासने देणाऱ्या भाजप सरकारने आधीच महागाई असताना पुन्हा त्यांच्यावर वाढीव कर लादले आहेत, त्यामुळे त्याला येणाऱ्या काळात विरोध केला जाणार असल्याचे ठाकरे यांनी सांगितले.
प्रकाश गजभिये म्हणाले, करवाढीवर चर्चा होऊ शकते, मात्र सत्तापक्ष यासाठी तयार नाही. जनतेच्या हिताचे निर्णय सभागृहात झाले पाहिजे त्यामुळे करवाढीला आमचा विरोध कायम राहणार आहे.

करवाढ आवश्यक -महापौर
महापौर प्रवीण दटके म्हणाले, सभागृहात कर वाढीचा प्रस्ताव यापूवीच्या सभेत आला, तो मंजूर झाला त्यामुळे त्यावर चर्चा करण्याची गरज नाही. ज्या काही लेखी सूचना आल्या आहेत त्या सूचनांचा अंतर्भाव करण्यात आला आहे. सभागृहात विषय मांडताना आणि तो मान्य नसेल तेव्हा सभागृहात गोंधळ करायचा हे विरोधी पक्षाचे काम आहे. जनतेच्या हिताच्या दृष्टीने निर्णय घेण्यात आला असून पाच वर्षांनी दरवाढ करणे आवश्यक असल्यामुळे ती करण्यात आली आहे.