३१ डिसेंबरच्या रात्री मस्त रंगलेली पार्टी.. पोटात गेलेले मद्य.. त्या मद्याचा अमल चढल्याने जडावलेले डोळे आणि लडखडणारे पाय.. या धुंदीतही डोळ्यांसमोर दिसणारा नाक्यानाक्यांवरील बंदोबस्त.. या सर्वामुळे गेल्या वर्षांच्या अखेरच्या रात्री बहुतांश लोकांनी आपापली घरे गाठण्यासाठी फ्लीट टॅक्सीचा आसरा घेतला. आठवडय़ातील इतर कोणत्याही दिवशी असलेल्या फ्लीट टॅक्सीच्या आरक्षणात ३१ डिसेंबरच्या रात्री तब्बल ३० टक्क्यांनी वाढ झाल्याचे समोर आले आहे. यात फोनवर उपलब्ध होणाऱ्या काळ्यापिवळ्या टॅक्सींचा टक्काही वाढल्याचे समजते.
सरत्या वर्षांच्या शेवटच्या रात्री शहरात मद्याचे किती पाट वाहणार, हे आधीच लक्षात आलेले असते. त्यानुसार ‘ड्रिंक अ‍ॅण्ड ड्राइव्ह’ विरोधात वाहतूक पोलीस मोहीमही हाती घेतात. त्यामुळे या एका रात्री ‘ड्रिंक अ‍ॅण्ड ड्राइव्ह’ प्रकरणात अडकलेल्यांच्या संख्येतही लक्षणीय वाढ झाल्याचे दिसते. तसेच मद्याच्या अमलाखाली गाडी चालवून अपघात होण्याचीही शक्यता असते. परिणामी यंदा मुंबईकरांनी आपापल्या गाडय़ा घरीच ठेवून टॅक्सी किंवा इतर मार्गानी पार्टी गाठणे पसंत केले. उच्च न्यायालयाने पार्टीसाठीचा कालावधी पहाटे पाचपर्यंत मंजूर केल्यामुळे अनेकांची पावले पहाटे अडीच-तीनपर्यंत बार टेबलभोवतीच रेंगाळत होती. घरी जाण्याची सोय म्हणून अनेकांनी पार्टीला येतानाच टॅब कॅब, मेरू, इझी कॅब, बुक माय कॅब अशा फ्लीट टॅक्सी कंपन्यांना फोन करून टॅक्सी आरक्षित करून ठेवली होती.
टॅब कॅबच्या ताफ्यात असलेल्या २८०० गाडय़ांपैकी रोज अंदाजे १०००-१२०० गाडय़ांना रात्रीचे आरक्षण असते. मात्र ३१ डिसेंबरच्या रात्री ताफ्यातील सुमारे दोन हजार गाडय़ा रस्त्यावर होत्या. या गाडय़ांचे आरक्षण नसले, तरीही आयत्या वेळीही टॅक्सी भाडय़ाने घेऊन इच्छित स्थळी जाण्याची सोय टॅब कॅबने केली होती. दुसऱ्या बाजूला बुक माय कॅब या कंपनीच्या ३५०० गाडय़ांपैकी १५०० गाडय़ांना दर दिवशी आरक्षण असते. यात ३१ डिसेंबरच्या रात्री ३० टक्क्यांनी वाढ झाल्याचे कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश गुप्ता यांनी सांगितले. फ्लीट टॅक्सीपैकी बहुतांश टॅक्सी या अंधेरी, खार, वांद्रे, गोरेगाव, मालाड येथील क्लब्ज, पब्ज आणि हॉटेलबाहेर आपल्या भाडय़ाची वाट बघत थांबल्या होत्या. त्याचप्रमाणे महालक्ष्मी ते दादर या टप्प्यातही अनेक टॅक्सींचेआरक्षण झाले होते.