पूर्व नागपुरातील डिप्टी सिग्नल परिसरातील एका शाळेत सात विद्यार्थिनींसोबततेथील शिक्षकच अश्लील चाळे करीत असल्याचे उघड झाले असून बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांच्या पुढाकाराने पालकांनी तक्रारी केल्यानंतर कळमना पोलिसांनी आरोपी शिक्षकाचा शोध सुरू केला.
कळमना बाजार तसेच कॉटन मार्केट बाजारात काम करणारे मजूर डिप्टी सिग्नल भागात मोठय़ा प्रमाणावर राहतात. त्यांची मुले-मुली या शाळेत शिकायला जातात.
गेल्या काही दिवसांपासून शाळेतील एक शिक्षक अश्लील चाळे करीत असल्याचे या विद्यार्थिनींनी घरी सांगितले. हे समजताच त्यांचे पालक हादरून गेले. या घटनेने त्या परिसरातील नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली. त्यांनी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना ही बाब सांगितली.
उमेश प्रधान यांच्यासह बजरंग दलाचे कार्यकर्ते, पालक तसेच इतर संतप्त नागरिक मंगळवारी दुपारी बारा वाजताच्या सुमारास या शाळेत गेले आणि त्यांनी मुख्याध्यापकांना घेराव घातला. घडलेला प्रकार त्यांच्या कानी घातला असता त्यांना त्याबाबत अनभिज्ञता दर्शविली. त्यामुळे नागरिकांच्या संतापात भर पडली. असा प्रकार यापुढे खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा देत हे कार्यकर्ते व पालक कळमना पोलीस ठाण्यात गेले.
कळमना पोलीस ठाण्यासमोर पालक तसेच नागरिकांचा जमाव जमला असल्याचे समजल्यानंतर पोलीस उपायुक्त संजय दराडे तेथे पोहोचले.
बजरंग दलाचे कार्यकर्ते व पालकांचे म्हणणे त्यांनी ऐकून घेतले. पीडित सात विद्यार्थिनी या सातवी, आठवी व नववीत शिकतात. ‘नापास करून टाकील, उत्तीर्ण होण्यासाठी जे सांगेल ते ऐकले पाहिजे, कुणाला सांगितल्यास नापास करेन’, अशी धमकी देत गुप्ता नावाचा शिक्षक अश्लील चाळे करीत होता. गेल्या काही महिन्यांपासून हा प्रकार सुरू असल्याचे विद्यार्थिनी व तिच्या पालकांनी पोलिसांना सांगितले. या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी विद्यार्थिनींची जबानी नोंदवून घेतली. आरोपी प्रदीप गुप्ता या शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याचा तातडीने शोध सुरू केला. हा शिक्षक आठ दिवसांपासून शाळेत आलेला नसल्याचे पोलिसांना समजले. काही दिवसांपूर्वी शांतीनगर परिसरातील एका नावाजलेल्या शाळेच्या आवारात एका विद्यार्थिनीवर अत्याचाराची घटना घडली होती.
पोलिसांनी गंभीरतेने तपास करून एका आरोपीस अटक केली. त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आल्याने पोलिसांनी तातडीने आरोपी शिक्षकाच्या शोधासाठी पथक रवाना केले. या शिक्षकाला सायंकाळी निलंबित करण्यात आल्याचे नागरिकांना समजले.