ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाबाहेरच्या जंगलातील ४२ वाघांचे संरक्षण व शिकार रोखण्यासाठी ३५ आदिवासी युवक व ३५ वनरक्षकांचे स्वतंत्र पथक तयार करण्यात येत आहे. या पथकाला वरिष्ठ वनाधिकारी, वन्यजीव क्षेत्रातील तज्ज्ञ, वन्यजीव अभ्यासक व स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी वन्यप्राण्यांचा मागोवा व गोपनीय माहिती संकलनाचे प्रशिक्षण देत असून वाघ व बिबटय़ाच्या शिकारीची माहिती देणाऱ्याला दहा हजार, सांबर, हरण व चितळासाठी पाच, तर अन्य प्राण्यांसाठी दोन हजार रुपये देण्यात येणार आहे.
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात कोअर व बफर झोनमध्ये पट्टेदार वाघांची संख्या ६५ आहे, तर ताडोबालगतच्या चंद्रपूर, ब्रम्हपुरी, वरोरा, भद्रावती, मूल, सावली, सिंदेवाही, नागभीड व चिमूर परिसरात ४२ वाघ आहेत. ताडोबातील वाघांच्या संरक्षणासाठी विशेष संरक्षण दल आहे, परंतु ताडोबाबाहेरील वाघांच्या संरक्षणाची संपूर्ण जबाबदारी वरिष्ठ वनाधिकाऱ्यापासून, तर वनरक्षक व वनपालांवर आहे, तसेच ताडोबाबाहेरील जंगलात शिकारीचे प्रमाणही अधिक आहे. त्यामुळे वाघ व इतर वन्यप्राण्यांची शिकार रोखण्यासाठी याच परिसरातील ३५ आदिवासी युवक व ३५ वनरक्षकांचे स्वतंत्र पथक तयार करण्यात येत आहे. चंद्रपूरचे विभागीय वनाधिकारी एन.डी.चौधरी यांच्या पुढाकारातून हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. यासाठी ३५ आदिवासी युवक व ३५ वनरक्षकांची निवड करण्यात आली असून त्यांना चिचपल्ली व टेमुर्डा येथे विशेष प्रशिक्षण देण्यात येत आहे. आज, २ डिसेंबरला उपविभागीय अधिकारी आशुतोष सलिल यांच्या हस्ते या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. वनपरिक्षेत्र अधिकारी दर्जाचे हे प्रशिक्षण असून त्यात मुख्य वनसंरक्षक संजय ठाकरे, वन्यजीव अभ्यासक नितीन देसाई, ट्रॅकच्या पूनम धनवटे, संजय करकरे, विभागीय वनाधिकारी गिरीष वशिष्ट, सहायक वनाधिकारी अरुण तिखे, एसीएफ पवार यांच्यासह वनखात्यातील वन्यजीव विभागातील तज्ज्ञ अधिकारी प्रशिक्षण देणार आहेत. २ ते १६ डिसेंबर असे सलग दोन आठवडे हे प्रशिक्षण चालणार असून त्यात वन्यप्राण्यांच्या शिकारीचा मागोवा व गोपनीय माहिती संकलन कशी करायची, याचे प्रशिक्षण देण्यात येत आहे.
वाघ, तसेच वन्यप्राण्यांची शिकार कशा प्रकारे होते, शिकार रोखण्यासाठी कोणत्या ठोस उपाययोजना करता येतात, जंगलात शिकारी येऊ नयेत म्हणून कोणती काळजी घ्यायची, तसेच शिकारी शिकार केल्यानंतर त्याची विल्हेवाट कशा पध्दतीने लावतात, जंगलात फासे कसे लावण्यात येतात. त्यात वन्यजीव व वाघ कसा अडकतो, यानंतर शिकारी त्या वन्यप्राण्याला जंगलातून कसा बाहेर काढतो, या सर्व गोष्टींचे प्रशिक्षण प्रात्यक्षिकांसह पॉवरपॉइर्ंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून देण्यात येत आहे. यासोबतच वाघांच्या नेहमीच्या रस्त्यांवर कॅमेरा ट्रॅप लावणे, या कॅमेराच्या माध्यमातून वाघांच्या हालचालींवर लक्ष ठेवणे, वाघ व इतर वन्यप्राणी जंगलात कशा पध्दतीने राहतात, याचे बारकाईने निरीक्षण करणे, यासोबतच जीपीएस तंत्रज्ञान, व रेडिओ कॉलरच्या माध्यमातून वन्यप्राण्यांवर कशा पध्दतीने लक्ष ठेवायचे, सभोवतालच्या पाच किलोमीटरच्या जंगलात वाघ व अन्य वन्यप्राण्यांचे वास्तव्य असेल तर त्याच्यावर कशा पध्दतीने लक्ष ठेवायचे आदि सर्व प्रकारचे प्रशिक्षण या आदिवासी युवकांना देण्यात येत आहे. कान्हा येथील काही प्रशिक्षित अधिकारीही या प्रशिक्षण शिबिरात सहभागी होणार असल्याची माहिती चौधरी यांनी लोकसत्ताशी बोलतांना दिली.
ताडोबाबाहेरच्या जंगलात येत्या जानेवारी व फेब्रुवारीत राष्ट्रीय व्याघ्रगणना हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. त्यात वाघांची गणना केली जाणार असून ती कशा पध्दतीने करायची, ट्रान्झीट लाईन व कॅमेरा ट्रॅपमध्ये वाघांच्या नोंदी कशा पध्दतीने घ्यायच्या, याचेही प्रशिक्षण यात दिले जात आहे. विशेष म्हणजे, या प्रशिक्षणातून तयार झालेल्या व त्यानंतर शिकारीची माहिती देणाऱ्यांना बक्षीसही दिले जाणार आहे.