सर्व क्षेत्रातील तंत्रज्ञान सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचले तरच समाजाचा सर्वागीण विकास होईल. हे तंत्रज्ञान समाजात पोहोचवण्याची जबाबदारी शासन व प्रशासनाची आहे. हे तंत्रज्ञान पोहोचले नाही तर समाज जगेल परंतु यंत्रणा नष्ट होईल, अशी भीती कराड येथील कृष्णा अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांनी व्यक्त केली.
सेंट्रल इन्स्टिटय़ूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंटतर्फे हॉटेल तुली इम्पीरियल येथे ‘आंतरराष्ट्रीय व्यवस्थापन परिषदेच्या विकास उद्दिष्टांना जिवंत ठेवणे’ या विषयावर आठवी आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेत प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. रणजित देशमुख हे उद्घाटक म्हणून तर डॉ. अमोल देशमुख अध्यक्षस्थानी होते. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या पश्चिम विभागाचे सहसचिव डॉ. देवेंद्र कावडे, पी.एस. दत्त, जवाहरलाल चरडे प्रामुख्याने उपस्थित होते. डॉ. कावडे यांनी संसाधनाचा उपयोग सर्वाच्याच प्रगतीसाठी करणे आवश्यक असल्याचे सांगितले. याप्रसंगी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते एका पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. उद्घाटन सत्रानंतर झालेल्या चर्चासत्रात गडचिरोली जिल्ह्य़ातील मेंढालेखा येथील सामाजिक कार्यकर्ते देवाजी तोफा यांनी आपले अनुभव कथन केले. ते म्हणाले, गावातील लोकांनी वनकायदा बदलवून १८ कोटी रुपयांचा बांबू उद्योग गावासाठी राबवला. दलालामार्फत होणारा व्यवहार हाणून पडला. देशाला स्वातंत्र्य मिळून ६५ वर्षे झाले असले तरी गडचिरोली जिल्ह्य़ातील आदिवासी अजूनही पारतंत्र्यातच असल्याचे त्यांनी अनेक उदाहरणे देऊन स्पष्ट केले. मूळच्या नागपूरच्या असलेल्या व आता मुंबईच्या अन्नपूर्णा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विशिखा जोगेवार यांनी मुंबईकरांना दररोज साडेबारा हजार चपाती खावू घालत असल्याचे सांगितले. या चपातीचे व्यवस्थापन कसे केले जाते, हे त्यांनी समजाऊन सांगितले. तर उद्योजक चिंचोळकर यांनी बांबू उद्योग उभारणीचे तंत्रज्ञान विषद केले.  तिसऱ्या सत्रात डॉ. सुरेश चारी, डॉ. देवेंद्र कावडे, डॉ. लोकेश चंद्र, डॉ. चलपतीराव, राहुल बागडीया, राजीव यशरॉय, यांनी गटचर्चेत लेखाशास्त्र, अर्थशास्त्र, आरोग्य विज्ञान, पर्यावरण, व्यवस्थापन, तंत्रज्ञानावर सखोल प्रकाश टाकला. या आंतरराष्ट्रीय परिषदेत ६० शोधनिबंध सादर करण्यात आले. अंजुमन अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या परवेझ या विद्यार्थिनीच्या शोधनिबंधाला प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळाले. प्राचार्य डॉ. अमिशी अरोरा यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाची भूमिका विशद केली. डॉ. कैलाश कडू यांनी आभार मानले.