डिसेंबरची गुलाबी थंडी पडू लागली की सगळ्यांना नवीन वर्षांचे आणि भेटवस्तू घेऊन येणाऱ्या नाताळच्या सांताक्लॉजबाबाचे वेध लागू लागतात. नव्या वर्षांचे स्वागत नव्या रंगरूपात करण्यासाठी कपडय़ांपासून ते गृहोपयोगी विविध वस्तूंच्या खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये लोकांची झुंबड उडू लागते. याचेच औचित्य साधत ‘लोकसत्ता’च्या वाचकांना खरेदीचा पुरेपूर आनंद मिळावा आणि त्याचसोबत भरघोस बक्षिसे मिळण्याची संधी देण्यासाठी ‘लोकसत्ता’ने १९ डिसेंबर ते ४ जानेवारीदरम्यान ‘मुंबई शॉपिंग फेस्टिव्हल’चे आयोजन केले आहे. रविवारी या फेस्टिव्हलला भेट देण्यासाठी आणि ग्राहकांशी संवाद साधण्यासाठी मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री तेजश्री प्रधान हिने दादर विभागातील काही दुकानांना भेट दिली.
रविवारी २१ डिसेंबरची दुपार दादरकरांसाठी एका वेगळ्याच कारणासाठी सुखाचा धक्का देणारी होती. दादरच्या वामन हरी पेठे सन्स, सारी पॅलेस, टोटल स्पोर्ट्स या दुकानांमध्ये रविवारचा मुहूर्त साधत खरेदी करायला गेलेल्या ग्राहकांशी संवाद साधण्यासाठी ‘होणार सून मी या घरची’ या मालिकेची नायिका आणि आबालवृद्धांची आवडती अभिनेत्री तेजश्री प्रधान आली होती. आपल्या या सफरीची सुरुवात तेजश्रीने ‘सारी पॅलेस’ या साडय़ांच्या दुकानातून केली. नाही नाही म्हणत, स्त्रीस्वभावाला अनुसरून तिने तेथील साडय़ांच्या कलेक्शनवर नजर तर टाकलीच, पण त्यासोबत तिच्या पसंतीस उतरलेली एक साडी नेसूनही पाहिली. खेळाच्या प्रत्येक गोष्टीचे भांडार असलेले ‘टोटल स्पोर्ट्स’चे दुकान तर तिच्या विशेष पसंतीचे असल्याचे तिने सांगितले. ‘वामन हरी पेठे सन्स’ यांच्या दुकानातील सोन्याच्या आणि हिऱ्याच्या दागिन्यांचे कलेक्शन पाहून ती थक्कच झाली. पण त्यातही तिच्यामुळे प्रसिद्ध झालेल्या तीनपदरी मंगळसूत्रानेही त्यांच्या दालनात स्थान मिळवले असल्याचे पाहून ती सुखावली. या वेळी दुकानांमध्ये उपस्थित ग्राहकांना तिच्यासोबत फोटो काढून घेण्याची संधीही मिळाली.
रिजन्सी ग्रुप हे या मुंबई शॉपिंग फेस्टिव्हलचे मुख्य प्रायोजक आहेत. त्याशिवाय जनकल्याण सहकारी बँक लिमिटेड हे या फेस्टिव्हलचे सहप्रायोजक आहेत. रेमंड शॉप हे स्टायलिंग पार्टनर, अंजली मुखर्जी यांचे हेल्थ टोटल हेल्थ पार्टनर, लागू बंधू आणि वामन हरी पेठे प्लॅटिनम पार्टनर असतील. अपना बाजार, पितांबरी आणि दादर येथील पानेरी यांच्या सहकार्याने हा महोत्सव होईल. वीणा वर्ल्ड हे ट्रॅव्हल पार्टनर आहेत. स्लीम अँड स्लेंडर वेल बीइंग पार्टनर म्हणून काम पाहतील. त्याशिवाय टोटल स्पोर्ट्स, कॅम्ब्रिज रेडीमेड्स- कुलाबा, राणेज् पर्सेस, रेन्बो गारमेंट्स, रोनाल्ड फूड प्रोसेसर, विधि ज्वेलर्स, अतुल इलेक्ट्रॉनिक्स, श्री पॅलेस हे गिफ्ट पार्टनर्स असतील.