गारपीट, पाऊस आणि ढगाळ वातावरणाने शांत झालेल्या सूर्यदेवाने पुन्हा एकदा डोके वर काढले असून नागपूरसह विदर्भातील जवळपास सर्वच जिल्ह्यांत पाऱ्याने उचल खाल्ली आहे. ३० ते ३५ अंशावर गेलेला तापमानाचा पारा पुन्हा एकदा ४५ अंश सेल्सिअस गाठण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे आठ दिवसांपूर्वी दुपारी रस्त्यावर दिसणारी वर्दळ पुन्हा एकदा कमी झाली आहे.
मार्च महिन्यातील गारपिटीने विदर्भात तापमानाचा पारा चांगलाच घसरला होता. मार्च अखेरीस आणि एप्रिलच्या सुरुवातीला उन्हाने हळूहळू डोके वर काढले आणि तापमानाच्या पाऱ्यानेसुद्धा चाळिशी गाठली. दरम्यानच्या काळात एप्रिलच्या मध्यात पुन्हा एकदा वादळ आणि पावसाने विदर्भात हजेरी लावली. त्यामुळे चाळिशीवर गेलेले तापमान ३४ अंशापर्यंत खाली आले. मात्र, आता पुन्हा एकदा तापमानाचा पारा सारखा चढत असून आता तो कमी होण्याची काहीही शक्यता नसल्याचे हवामानतज्ज्ञांनी सांगितले.
शहरातील ओस पडलेल्या रस्त्यांनीच उन्हं वाढू लागल्याची पावती दिली. कालपरवापर्यंत रात्रीचा सुखावणारा नैसर्गिक गारवा आता ओस पडला आहे आणि वातानुकूलित यंत्रणा व कूलरच्या सहाय्याने कृत्रिमरीत्या गारवा निर्माण केल्याचे चित्र प्रत्येक घरात दिसून येत आहे. शहरातील रस्तोरस्ती आणि गल्लोगल्ली नारळपाणी, लिंबू पाणी, ऊसाच्या रसाच्या गाडय़ांवरची वर्दळ वाढली आहे. एरवी दुपारीसुद्धा गजबजणारा बर्डीचा परिसर शांत भासत असून सायंकाळी सहानंतरच थोडीफार रेलचेल जाणवायला लागली आहे. उन्हाचा तडाखा सायंकाळी सहा-साडेसहापर्यंत कायम असल्याने ‘झळा या लागल्या जिवा’ असे म्हणल्यावाचून राहवत नाही.
साधारणपणे मार्चच्या पहिल्या आठवडय़ातच विदर्भ तापायला लागतो, पण अवकाळी पाऊस आणि गारपिटीने यावर्षी निसर्गचक्र पालटले. एप्रिलच्या मध्यान्हानंतर उन्हं तापायला सुरुवात झाली आहे आणि तापमानाचा हा पारा चांगलाच वाढेल, असा अंदाज आहे.
गेल्या मोसमात पाऊस आणि थंडीने कहर केला. मार्च आणि एप्रिलपर्यंत पाऊस अधुनमधून डोकावतच राहिला आणि थंडीनेही यावर्षी जुने विक्रम मोडीत काढले. त्यामुळे उन्हाळासुद्धा तेवढाच कहर बरसणार यात शंका नाही. एवढे मात्र खरे की आता घराबाहेर पडणारे नागरिक उन्हापासून सुरक्षा करणाऱ्या साधणासहच बाहेर पडायला लागले आहेत.