गावातील शांततेचे वातावरण विकास प्रक्रियेला पोषक ठरत असते. ही बाब लक्षात घेऊन शासनाने ग्रामीण भागातील तंटा-बखेडय़ांचे प्रमाण कमी करण्यासाठी महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान सुरू केले आहे. या माध्यमातून स्थानिक पातळीवरील तंटे सामोपचाराने मिटविणे आणि विविध स्वरूपाचे उपक्रम राबवून ग्रामीण भागाच्या विकासाला चालना देण्याचा प्रयत्न होत आहे. या अभियानातील एकूणच कामगिरीचा वेध लेखमालेतून घेण्यात येत आहे. मालेतील एकविसावा लेख.

महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेचा कार्यकाळ एक वर्षांचा आहे. मोहिमेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक गावाला तंटामुक्त गाव समिती स्थापन करणे अनिवार्य असते. या कालावधीत सामोपचाराने तंटे मिटविणे वा नव्याने तंटे निर्माण होऊ नयेत म्हणून प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासदेखील पुरेसा वेळ मिळत नाही. ही बाब लक्षात घेऊन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी मोहिमेचा कालावधी दोन वर्षांचा करण्याचे जाहीर केले होते. त्या अनुषंगाने समितीला काम करण्यास पुरेसा वेळ मिळणार होता. तथापि, गृहमंत्र्यांची ही घोषणा अद्याप कागदावर न आल्याने हा विषय प्रलंबित राहिला आहे.
तंटामुक्त गाव समिती कायमस्वरूपी कार्यरत राहते. दरवर्षी १५ ऑगस्ट ते ३० ऑगस्ट या कालावधीत मोहिमेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या ग्रामपंचायतींनी ग्रामसभा आयोजित करून या मोहिमेत सहभाग घेण्याचा निर्णय घेणे अनुस्युत आहे. या संदर्भातील पत्र व तंटामुक्त गाव समिती सदस्यांची यादी संबंधित पोलीस ठाण्यास पाठविली जाते. समिती सदस्यांसाठी शासनाने आचारसंहिता ठरवून दिलेली आहे. समितीच्या सदस्यांनी निरपेक्ष व नि:पक्षपातीपणे काम करणे आवश्यक आहे. सदस्यांनी समितीच्या बैठकांना उपस्थित राहणे, समितीच्या कामासाठी वेळ देणे व तंटे मिटविण्याच्या कामात रस घेणे आवश्यक आहे. तंटे मिटविताना सकारात्मक दृष्टिकोन असणे गरजेचे आहे. या प्रक्रियेत नकारात्मक अथवा पूर्वग्रहदूषित दृष्टिकोन असल्यास मोहिमेचा मूळ उद्देश साध्य होणार नाही. जे सदस्य समितीच्या कामकाजात रस घेत नसतील, समितीच्या कामकाजात अडथळा निर्माण करत असतील, अशा सदस्यांना बदलून नवीन सदस्य घेण्याचा निर्णय प्रत्येक वर्षांच्या पहिल्या ग्रामसभेत ग्रामसभेच्या मान्यतेने घेता येतो. परंतु, नियमानुसार कोणत्याही परिस्थितीत तंटामुक्त गाव समितीचे एक तृतीयांशहून अधिक सदस्य एकाच वेळी बदलता येत नाही. तसेच समितीचा अध्यक्ष बदलण्याची ग्रामसभेला आवश्यकता वाटत असल्यास अध्यक्ष बदलून नवीन अध्यक्षाची निवड त्याच ग्रामसभेत करावी लागते.
हे सोपस्कार पार पाडल्यानंतर पोलीस ठाण्याचे प्रमुख तंटामुक्त गाव समितीच्या जाहीर यादीची प्रत ग्रामपंचायतीस पाठवितात. गावांमध्ये शक्यतोवर तंटे निर्माण होऊ नयेत, जातीय व धार्मिक सलोखा, सामाजिक व राजकीय सामंजस्य आणि अनिष्ट प्रथांचे निर्मूलन करण्यासाठीच्या व इतर सुयोग्य प्रतिबंधात्मक उपाययोजनांची रूपरेषा ठरविणे, त्याबाबत जनजागृती करणे व अंमलबजावणी करण्याची जबाबदारी समितीवर असते. तंटे मिटविताना तंटामुक्त गाव समिती ही मध्यस्थ व प्रेरकाची भूमिका निभावते. या सर्व कामांसाठी समितीला एक वर्षांचा कालावधी मिळतो. कारण, वर्षभरात प्रत्येक गावाच्या कामगिरीचे मूल्यमापन केले जाते. मोहिमेचा हा कालावधी अतिशय कमी असल्याचे निष्पन्न झाल्यावर मध्यंतरी गृहमंत्र्यांनी तो दोन वर्षांचा करण्याचे सूतोवाच केले होते. परंतु हा निर्णय अद्याप दृष्टिपथास आला नसल्याचे स्पष्ट झाले आहे.