विविध दहशतवादी संघटनांनी दहशतवाद्यांचे चार गट भारतात पाठवले असून त्यापैकी एक गट मुंबईत आल्याची माहिती गुप्तचर विभागाने दिली आहे. मुंबईत २८ जानेवारी पूर्वी घातपात घडविण्याची त्यांची योजना असून त्यासाठी सतर्कतेचा इशाराही देण्यात आलेला आहे.
 गुप्तचर विभागाने आसाम पोलिसांचा हवाला देत मुंबई पोलिसांना हा सतर्कतेचा इशारा दिलेला आहे. त्यानुसार जमात-उल-दावा, लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहम्मद आणि हिजबुल मुजाहिद्दीन या कट्टर दहशवतवादी संघटनांनी मुंबईत आपले दहशतवादी पाठवले आहेत. एकूण चार गटांत हे दहशतवादी आहेत. या चार गटांपैकी एक उत्तर प्रदेशात, एक ओरिसामध्ये, एक राजस्थानमध्ये आणि चौथा गट मुंबईत पाठविण्यात आलेला आहे. मुंबईत हल्ला करण्याची जबाबदारी असलेल्या दहशतवाद्यांची नावे अब्दुला अल कुरेशी, नासीर अली, जावेद इक्बाल, मोबीद झेमन आणि समशेर असल्याचे गुप्तचर विभागाने म्हटले आहे. सिद्धिविनायक मंदिरात घातपात घडविण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचे गुप्तचर विभागाने म्हटले आहे. या सतर्कतेच्या पाश्र्वभूमीवर सिद्धिविनायक मंदिर परिसरात बंदोबस्त वाढविण्यात आलेला आहे.
 २६ जानेवारी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या भारत भेटीच्या पाश्र्वभूमीवर हा सतर्कतेचा इशारा महत्त्वाचा मानला जात आहे. अशा प्रकारचा सतर्कतेचा इशारा मिळाल्याचे मुंबई पोलिसांचे प्रवक्ते आणि पोलीस उपायुक्त डॉ. धनंजय कुलकर्णी यांनी सांगितले. अशा सूचना मिळत असतात आणि यापूर्वीच मुंबईत आम्ही बंदोबस्त वाढवल्याचे ते म्हणाले. गुप्तचर खात्याच्या सतर्कतेच्या या नव्या इशाऱ्यानंतर आम्ही काही उपाययोजना केलेल्या आहेत. पण त्या सुरक्षेच्या कारणामुळे उघड करता येणार नाहीत, असेही ते म्हणाले. मुंबई पोलीस सक्षम असून नागरिकांनी घाबरू नये असे आवाहनही त्यांनी केले आहे.  चालू महिन्याच्या सुरुवातीला मुंबई आतंरराष्ट्रीय विमानतळाच्या पुरुष प्रसाधनगृहात दोन वेळा इसिस मुंबईत घातपात घडविणार आहेत अशा आशयाच्या धमकीचा संदेश लिहिण्यात आलेला होता. त्यामुळे पोलीस यंत्रणांना यापूर्वीच सतर्क करण्यात आलेले आहे.