निवडणुकीच्या कामामुळे आधीच बेजार झालेल्या जिल्हा परिषदेच्या काही शिक्षकांवर आता शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) अर्ज तपासणीचे काम सोपविण्यात आले आहे. दीपोत्सवास सुरुवात झाली असताना सणासुदीच्या काळात शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर हा बोजा टाकण्यात आल्याने संबंधितांमध्ये कमालीची नाराजी आहे. त्यात, कागदपत्रांची तपासणी करताना परीक्षार्थी व कर्मचारी यांच्यात शाब्दिक खटकेही उडत आहेत. ग्रामीण भागातील केंद्रावर हे अर्ज जमा न करता शहरातील केंद्रांकडे बहुतांश विद्यार्थी धाव घेत असल्याने विचित्र स्थिती निर्माण झाली आहे.
सीबीएस परिसरातील गट संसाधन केंद्रात सध्या शिक्षक पात्रता परीक्षा अर्ज तपासणीचे काम सुरू आहे. शिक्षकांसाठी ही परीक्षा गतवर्षीपासून अनिवार्य करण्यात आली. यामुळे यंदाही अर्ज भरण्यासाठी इच्छुकांची एकच गर्दी झाली आहे. वास्तविक हे सर्व अर्ज राज्य शासनाच्या संकेतस्थळावरून ऑनलाइन पद्धतीने भरण्यात आले आहेत. त्यांची छायांकित प्रत ताब्यात घेताना अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांची छाननी या केंद्रावर होते. शासनाने जिल्ह्यातील बागलाण, देवळा, चांदवड, इगतपुरी, मालेगाव, नांदगाव, निफाड, सिन्नर, दिंडोरी, त्र्यंबकेश्वर, सुरगाणा, पेठ, येवला, कळवण या ठिकाणी हे अर्ज छाननी करण्याची व्यवस्था उपलब्ध करून दिली. नाशिक केंद्रावर या संदर्भात दोन बूथना मान्यता देण्यात आली आहे. मात्र उमेदवारांकडून नाशिक केंद्रावर अर्ज छाननी करण्याचे प्रमाण लक्षणीय आहे. जिल्ह्यातील इतर केंद्रांवर आठ दिवसांत केवळ ३०० ते ४०० अर्ज जमा झाले. तुलनेत नाशिकच्या केंद्रावर दिवसभरात ९०० हून अधिक अर्जाची छाननी होत आहे. दोन दिवसांत चार हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी या प्रक्रियेत सहभाग घेतला. शहरातील केंद्रावर टळटळीत उन्हात अर्ज छाननी करण्यासाठी युवती, बाळासह महिला व अन्य मंडळींनी गर्दी केली. गुरुवारपासून शासकीय सुटी सुरू होत असल्याने तत्पूर्वी अर्ज छाननी करण्याकडे त्यांचा कल आहे.
नाशिक केंद्रावर झालेली गर्दी लक्षात घेऊन छाननीसाठी अतिरिक्त तीन बूथ सुरू करण्यात आले. त्यात महिला व पुरुष उमेदवारांच्या वेगवेगळ्या रांगा आहेत. असे असताना बाहेरगावाहून येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या पाहता त्यांना पंचायत समितीच्या आवारातील केंद्रात अर्ज देण्याचे आवाहन करण्यात आले. मात्र आम्ही लांबून आलोत, आता आधी आमचे अर्ज पाहा, असा तगादा काही मंडळींकडून लावला जात असल्याने खटके उडत आहे. काहींनी अर्ज योग्य पद्धतीने भरला नाही, अर्जावर चुकीची माहिती दिल्यानंतर ते अर्ज संकलित करणाऱ्या अधिकाऱ्यांशी हुज्जत घालत असल्याचे दिसते. छाननी अधिकारी हे आधी निवडणुकीच्या कामात व्यस्त होते. त्यातून सुटका होते न होते तोच आमच्यावर जादा कामाची ही जबाबदारी सणासुदीच्या काळात लादली गेल्याची त्यांची भावना आहे. प्रामुख्याने महिला कर्मचारी या जबाबदारीने त्रस्त आहेत. इतरांप्रमाणे आम्हालाही काही घरची कामे आहेत, सणवार आहेत पण शासनाला आमची काळजीच नाही, अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली. उमेदवारांनी २७ ऑक्टोबपर्यंत संकेत स्थळावरील संपूर्ण माहिती वाचून अर्ज छाननीसाठी यावे, असे आवाहन अधिकाऱ्यांनी केले आहे.
छाननीचे नेमके प्रयोजन काय?
शिक्षक पात्रता परीक्षेचे अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरण्यात येत आहे. या बाबत विद्यार्थ्यांकडून काही चूक झाली की नाही हे तपासण्याचे काम या छाननी प्रक्रियेत केले जाते. मात्र अर्ज ऑनलाइन पद्धतीने नोंदविताना त्यांना एक विशिष्ट संकेतांक दिला जातो. त्या संकेतांकावर अर्ज संगणकावर उघडला असता अपेक्षित बदल करण्याचा प्रयत्न केला तरी बदल होत नाही. मग या छाननीचे नियोजन काय, असा संतप्त प्रश्न कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला आहे.