नवी मुंबईचे नवनियुक्त पोलीस आयुक्त प्रभात रंजन यांनी बुधवारी अचानकपणे खांदेश्वर पोलीस ठाण्याला भेट दिल्याने येथील पोलीस अधिकाऱ्यांपासून कर्मचाऱ्यांपर्यंत पाचावर धारण उडाली. या वेळी आयुक्तांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना काही खडे बोल सुनावत पोलीस कर्मचाऱ्यांशी सुसंवाद साधला.
बुधवारी दुपारी १२ वाजता बेलापूर येथील पोलीस आयुक्त कार्यालयातून आयुक्त प्रभात रंजन यांची गाडी बाहेर पडली. आयुक्तांनी ही भेट गोपनीय ठेवल्याने ते पनवेलच्या दिशेने जात आहेत. याची कल्पना त्यांच्या सुरक्षा यंत्रणेतील अधिकाऱ्यांनाही आली नाही. यापूर्वी नवीन पोलीस आयुक्त येण्याअगोदर आयुक्तालयातून संबंधित परिमंडळाचे उपायुक्तापासून ते वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना सूचित केले जात होते. आयुक्त ज्या मार्गावरून जातात, त्या मार्गावरील वाहतूक यंत्रणेचे नियमन केले जायचे. मात्र आयुक्त रंजन यांनी आपण कुठे जातोय याची माहिती दिली नव्हती. त्यामुळे सर्वच संभ्रमात होते. कळंबोली सर्कलच्या पुढे पोलीस आयुक्तांची गाडी गेल्यानंतर अनेकांनी आयुक्त पनवेलपुढे गेल्याचा अंदाज लावला. मात्र तीच आयुक्तांची मोटार खांदेश्वर पोलीस ठाण्याच्या इमारतीपुढे उभी राहिली आणि त्या वेळी पोलीस ठाण्यात हजर असणाऱ्या पोलिसांची एकच पळापळ झाली. या वेळी तक्रारदार पोलीस ठाण्याबाहेर ताटकळत बसलेले असल्याचे आयुक्तांना दिसले. त्यावरुन आयुक्तांनी पोलिसांना फैलावर घेतले. सुमारे एक तासांच्या प्रश्नोत्तरांच्या तासांनंतर आयुक्त रंजन पुन्हा आपल्या मोटारीतून पोलीस आयुक्तालयात गेले. आयुक्तांच्या या अचानक वारीच्या खबरीचा धसका सव्वा वाजेपर्यंत इतर १९ पोलीस ठाण्याच्या वरिष्ठांपासून ते संबंधित पोलीस उपायुक्तांनी घेतला होता. प्रामाणिक आयुक्त रंजन यांना गैरकारभार करणारे पोलीस खात्यात चालत नाहीत, याबाबत अनेक दिवसांपासून दलात चर्चा होती, बुधवारच्या अचानकच्या भेटीमुळे या चर्चेला दुजोरा मिळाला.

पत्त्यांचा क्लब बंद करण्याचे आदेश
तक्रारदारांचे समाधान करा, काळाबाजार होऊ नका देऊ आणि स्वत: करू नका, असे सुनावत आयुक्तांनी सामान्य शिपायापासून ते विविध अधिकाऱ्यांशी या वेळी संवाद साधला आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक जनार्दन थोरात यांची चांगलीच उजळणीदेखील घेतली. या वेळी आयुक्तांनी खांदेश्वर येथील राज क्लब हा पत्त्याच्या नोंदणीकृत असणारा क्लब बंद करण्याचे फर्मान सोडले.  पोलीस ठाण्यात रोज होणारे कामकाज वगळता गुन्हेगारांपर्यंत पोहोचण्यासाठी कोणत्या युक्त्या लढविल्या जात आहेत याची माहिती थोरात यांना आयुक्तांनी विचारले असता ते निरुत्तर झाले.