ठाणे महापालिकेच्या वास्तूंचे आणि मालमत्तेचे रक्षण करणाऱ्या भांडुप बोर्डाच्या ३८५ सुरक्षारक्षकांना गेल्या दोन महिन्यांपासून पगार मिळालेला नाही. महापालिका सुरक्षारक्षकांच्या भरती प्रक्रियेस उशीर होत असल्यामुळे वर्षभरापासून या सुरक्षारक्षकांना तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात येत आहे. मात्र, लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे सुरक्षारक्षकांच्या मुदतवाढीच्या प्रस्तावास मंजुरी मिळू शकलेली नाही. त्यामुळे एप्रिल आणि मे या दोन महिन्यांचे वेतन सुरक्षारक्षकांना अद्याप मिळू शकलेले नाही.  
ठाणे महापालिकेच्या ताफ्यात सुमारे ५५० सुरक्षारक्षक असून त्यामध्ये भांडुप बोर्डाच्या ३८५ सुरक्षारक्षकांचा समावेश आहे. महापालिका मुख्यालय, नऊ प्रभाग समित्या, नाटय़गृह, पाण्याच्या टाक्या अशा महत्त्वाच्या ठिकाणी हे सुरक्षारक्षक पहारा देतात. २००३ पासून भांडुप बोर्डाचे सुरक्षारक्षक महापालिकेत ठेका पद्धतीने कार्यरत असून या सुरक्षारक्षकांच्या ठेक्याला दरवर्षी मुदत वाढ देण्यात येते.
गेल्या वर्षी महापालिकेने सुरक्षारक्षकांची भरती करण्याचा निर्णय घेतला असून त्यानुसार भरती प्रक्रियाही सुरू केली आहे. सुरक्षारक्षकांची भरती होताच बोर्डाच्या सुरक्षारक्षकांना परत पाठवायचे, असाही निर्णय महापालिकेने घेतला होता. त्यामुळे गेल्या वर्षभरापासून महापालिका बोर्डाच्या सुरक्षारक्षकांना एक वर्षांऐवजी तीन महिन्यांची मुदत वाढ देत आहे. भरती प्रक्रियेस उशीर होत असल्यामुळे आतापर्यंत दोन ते तीन वेळा अशाप्रकारे मुदतवाढ देण्यात आली आहे.
दरम्यान, मार्च २०१४ मध्ये बोर्ड सुरक्षारक्षकांच्या मुदतवाढीचा ठेका संपला. मात्र, भरती प्रक्रिया पूर्ण झालेली नसल्यामुळे महापालिकेने बोर्डाच्या सुरक्षारक्षकांना अद्याप परत पाठविलेले नाही. असे असतानाच लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्यामुळे मुदतवाढीच्या प्रस्तावास अद्याप मंजुरी मिळू शकली नाही.
परिणामी एप्रिल आणि मे महिन्यांचा पगार सुरक्षारक्षकांना मिळू शकलेला नाही. दरम्यान, येत्या सर्वसाधारण सभेत यासंबंधीचा प्रस्ताव सादर करण्यात आला असून भरती प्रक्रियेस उशीर होत असल्यामुळे वर्षभराची मुदतवाढ देण्याचे सुचविले आहे, अशी माहिती महापालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.