पावसाळ्यात आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ मदत पोहचविण्यासाठी तत्पर असलेल्या नियंत्रण कक्षाला चुकीची माहिती देऊन दिशाभूल करणाऱ्या दूरध्वनींची संख्या गेल्या काही महिन्यांपासून वाढू लागली आहे. दूरध्वनीवरून खोटी माहिती देऊन संपूर्ण आपत्कालीन यंत्रणेला वेठीस धरीत शहरात घबराटीचे वातावरण निर्माण करणाऱ्या ‘बिनकामी बहाद्दरांमुळे’ या विभागाचे अधिकारीही हैराण झाले आहेत. त्यामुळे उगाच लांडगा आल्याची आवई उठविणाऱ्यांना अद्दल घडविण्यासाठी या विभागाच्या अधिकाऱ्यांनी आता पोलिसांची मदत घेण्याची योजना आखली असून अशाच एका खोटय़ा दूरध्वनीची माहिती नौपाडा पोलिसांना पत्राद्वारे दिली आहे. त्यानुसार या प्रकरणाचा सविस्तर तपास करून या महाभागांचा शोध सुरू केला आहे.  
ठाणे महापालिकेने शहरातील आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाची निर्मिती केली असून हा विभाग वर्षभर २४ तास कार्यरत असतो. विशेषत: पावसाळ्यात आपत्कालीन परिस्थिती उद्भवण्याची दाट शक्यता असते. तसेच शहरातील अनधिकृत आणि धोकादायक इमारती कोसळण्याच्या दुर्घटना यापूर्वी घडल्या आहेत. त्यामुळे पावसाळ्यात या विभागाचे अधिकारी अधिक सतर्क राहत असल्याचे चित्र आहे. नियंत्रणात कक्षात येणाऱ्या प्रत्येक दूरध्वनीची खात्री या विभागाकडून केली जात असल्याने त्याचाच फायदा काही बिनकामी बहाद्दर घेऊ लागल्याचे चित्र समोर येऊ लागले आहे. इमारतीचा स्लॅब कोसळला आहे.. इमारतीमध्ये आग लागली आहे.. रस्त्यात झाड पडले आहे.. अशी खोटी माहिती देणारे दूरध्वनी गेल्या काही महिन्यांपासून आपत्कालीन नियंत्रण कक्षात खणखणू लागले आहेत. अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन खात्री केल्यानंतर दूरध्वनीवरील माहिती खोटी असल्याचे अनेकदा उघड झाले आहे. या बहाद्दरांच्या प्रतापामुळे या विभागाचे अधिकारी चक्रावले असून या खोटय़ा दूरध्वनींमुळे संपूर्ण आपत्कालीन यंत्रणेची धावपळ होत असल्याने अधिकारी हैराण झाले आहेत. त्यामुळेच अशा फसव्या दूरध्वनींना आळा बसावा आणि बिनकामी बहाद्दरांचा उपद्रवाला लगाम बसावा, यासाठी महापालिकेने आता पोलिसांची मदत घेण्याचे ठरविले आहे. बिनकामी बहाद्दरांना जेलमध्ये पाठवून अद्दल घडविण्याची योजना महापालिकेने आखण्यास सुरुवात केली आहे. गेल्या महिन्यात उथळसर भागात इमारतीचा स्लॅब कोसळल्याचा दूरध्वनी आपत्कालीन नियंत्रण कक्षात आला होता. मात्र, अधिकारी घटनास्थळी गेले असता, त्या ठिकाणी अशी घटना घडली नसल्याचे समोर आले होते. त्याचाच आधार घेत महापालिकेने नौपाडा पोलिसांना पत्र पाठविले असून त्यात दूरध्वनीवर खोटी माहिती देऊन संपूर्ण यंत्रणा वेठीस धरणाऱ्या ‘बिनकामी बहाद्दरांची’ माहिती दिली आहे. तसेच या बहाद्दरांचा शोध घेऊन त्यांच्यावर फौजदारी तसेच आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कारवाई करण्याची मागणी केली आहे, अशी माहिती महापालिका सूत्रांनी दिली.
आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या नियंत्रण कक्षात दूरध्वनीद्वारे खोटी माहिती देऊन संपूर्ण यंत्रणेला वेठीस धरणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यासंबंधी महापालिकेने अर्ज दिला असून त्यानुसार तपास सुरू करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणी गुन्हा दाखल करून संबंधितांवर कारवाई करता येऊ शकते का, याचीही चाचपणी सुरू आहे, अशी माहिती नौपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप पगारे यांनी ‘वृत्तान्त’ला दिली.