ठाणे, कळवा आणि मुंब्रा यांसारख्या शहरांमधील उद्यानांना नियमित पाणीपुरवठा करता यावा यासाठी जुन्या आणि नादुरुस्त अवस्थेत असलेल्या कूपनलिकांची दुरुस्ती करण्याचा निर्णय ठाणे महापालिकेने घेतला आहे. शहरातील सुमारे ८०० पेक्षा अधिक कूपनलिकांच्या दुरुस्तीची कामे मध्यंतरी काढण्यात आली होती, मात्र या कामांची प्रभावीपणे अंमलबजावणी झाली नसल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. या पाश्र्वभूमीवर पाण्याची वारेमाप होणारी नासाडी रोखण्यासाठी कूपनलिकांच्या दुरुस्तीचा पर्याय शोधण्यात आला असून उद्यानांना भरपूर पाणी मिळावे हादेखील त्यामागचा उद्देश आहे.

ठाणे, कळवा, मुंब्रा यांसारख्या शहरांमधील काही भागांमध्ये पाण्याची होणारी वारेमाप नासाडी रोखण्यासाठी तातडीने उपाय आखणाऱ्या महापालिकेने आता शहरातील सुमारे ८०० कूपनलिका दुरुस्त करण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिका क्षेत्रातील बहुतांश कूपनलिकांमधील पाण्याचा वापर अग्निशमन केंद्र, रुग्णालये, शाळा, उद्यानांच्या देखभालीसाठी होत असतो. वर्षांनुवर्षे देखभालीअभावी रडतखडत सुरू असलेल्या या कूपनलिकांची युद्धपातळीवर दुरुस्ती करण्याचा निर्णय अभियंता विभागाने घेतला आहे. ठाणे, कळवा, मुंब्रा या शहरांमध्ये महापालिकेच्या सुमारे ८०० कूपनलिका आहेत. त्यापैकी ७२५ कूपनलिका हातपंपासहित आहेत. या कूपनलिकांचा वापर मोठय़ा प्रमाणावर होत असतो. पाणीटंचाईच्या काळात सार्वजनिक ठिकाणी रहिवाशांकडून या कूपनलिका वापरात आणल्या जातात, असा अहवाल पाणीपुरवठा विभागाने सादर केला आहे. ठाणे, कळवा, मुंब्रा या शहरांच्या महत्त्वाच्या भागांमध्ये सद्य:स्थितीत नियमित पाणीपुरवठा होत असला तरी पाटबंधारे विभागाच्या आदेशामुळे आठवडय़ातून किमान एक दिवस शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

२० लाखांचे कंत्राट
उन्हाळ्याच्या दिवसांत हातपंप दुरुस्तीविषयी नागरिकांच्या अनेक तक्रारी प्राप्त होत आहेत. या पाश्र्वभूमीवर या सर्व कूपनलिकांची युद्धपातळीवर दुरुस्ती करण्याचा निर्णय पाणीपुरवठा विभागाने घेतला असून त्यासाठी सुमारे २० लाख रुपयांचे कंत्राट देण्यात आले आहे. विद्युतपंपासह उभारण्यात आलेल्या सुमारे ७५ कूपनलिकांची दुरुस्ती पूर्ण झाल्यास उद्यानांना होणारा पाणीपुरवठय़ाचा प्रश्न निकाली काढता येऊ शकतो, असा दावाही पाणीपुरवठा विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याने केला.