आरक्षित भूखंडांवर जागोजागी बेकायदा बांधकामांचे इमले उभे राहिल्याने खेळासाठी मोकळ्या जागा आणि मैदानांची वानवा असलेल्या ठाणे, कळव्यासारख्या शहरांमधील तरुणाईला आकर्षित करण्यासाठी ठाणे महापालिकेने जगभरात झपाटय़ाने लोकप्रिय होत असलेली ‘क्लायम्बिंग वॉल’ या साहसी खेळाची संकल्पना ठाण्यात राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
उंच िभतींवर गिर्यारोहणाप्रमाणे खेळला जाणारा हा सहासी खेळ परदेशात मोठय़ा प्रमाणावर लोकप्रिय आहे. भारतात काही अ‍ॅम्युझमेंट पार्कमध्ये या खेळाच्या लहानग्या प्रतिकृती तयार करण्यात आल्या असल्या तरी या साहसी खेळाची संकल्पना अद्याप फारशी रूढ नाही. हा खेळ ठाण्यातील तरुणांच्या अंगवळणी पडावा यासाठी महापालिकेने प्रयत्न सुरू केले असून त्यासाठी काही जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. तेथे या खेळाकरिता भिंती उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी सुमारे सहा कोटी रुपयांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. मुंबई तसेच नवी मुंबईसारख्या लगतच्या शहरांमधील खेळाडूंनाही या भिंतींवर चढाई करण्यासाठी विशेष सवलत पुरवली जाणार आहे.
बेकायदा बांधकामांचे शहर म्हणून बदनाम असणाऱ्या ठाणे शहरात खेळण्यासाठी पुरेशा प्रमाणात मैदाने उपलब्ध नाहीत. या शहरात मोठय़ा प्रमाणावर तलाव आहेत. त्यामुळे नागरिकांना फेरफटका मारण्यासाठी महापालिकेने या तलावांभोवती काही उद्यानांची निर्मिती केली आहे. असे मोजके अपवाद वगळले तर उद्याने आणि मैदानांसाठी आरक्षित असलेल्या अनेक भूखंडांवर बेकायदा बांधकामांचे इमले उभे राहिले आहेत. उद्यानांच्या उभारणीसाठी पुरेशा जागा नसल्याने महापालिकेला पूर्व द्रुतगती महामार्गालगत असलेल्या पदपथांवर हिरवा पट्टा तयार करावा लागला आहे. नियोजनाच्या आघाडीवर हे शहर कसे कोलमडले आहे याचे हे मोठे उदाहरण ठरले आहे. सेंट्रल मैदानासारखे विस्तीर्ण मैदान ठाण्यात अपवादानेच आढळते. वागळे, वर्तकनगर, कोपरी यांसारख्या भागात मोठय़ा प्रमाणावर बेकायदा बांधकामे उभी राहिली आहे. कळवा-मुंब्रा तर अशा बांधकामांचे आगार आहे. त्यामुळे तेथेही खेळासाठी मोकळी मैदाने अपवादानेच पाहायला मिळतात. मोकळ्या जागांची वानवा लक्षात घेता मैदानी खेळ खेळायचे कुठे, हा मोठा प्रश्न ठाणेकरांना वर्षांनुवर्षे भेडसावतो आहे. या आघाडीवर पूर्णपणे हतबल झालेल्या महापालिकेने आता तरुणांपुढे खेळासाठी ‘क्लायम्बिंग वॉल’सारखा नवा पर्याय ठेवला आहे.
वागळे परिसरात पहिली भिंत
ठाणे, कळवा, घोडबंदर पट्टय़ात टप्प्याटप्प्याने अशा स्वरूपाच्या क्लायम्बिंग वॉल (कृत्रिम प्रस्तरारोहण) उभारण्याचे निश्चित करण्यात आले असून पहिल्या टप्प्यात वागळे परिसरात हे काम सुरू करण्यात येणार आहे. सेफ्टी बेल्ट लावून कृत्रिम भिंतीवर चढण्याचा हा खेळ ठाण्यात लोकप्रिय व्हावा यासाठी अ‍ॅडव्हेंचर स्पोर्ट्स असोसिएशन या संस्थेची मदत महापालिका घेणार आहे. ठाणे महापालिकेस वागळे परिसरात एसीसी कंपनीकडून सुमारे ११०० चौरस मीटर क्षेत्रफळाचा एक सुविधा भूखंड प्राप्त झाला आहे. या भूखंडांवर प्रायोगिक तत्त्वावर ही ‘भिंत’ उभारली जावी, असा प्रस्ताव या भागातील आमदार एकनाथ िशदे आणि नगरसेवक नरेश म्हस्के यांनी ठाणे महापालिकेपुढे ठेवला आहे. यानुसार सुमारे सहा कोटी रुपयांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले असून ‘बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा’ या धर्तीवर हे काम सुरू केले जाईल, अशी माहिती महापालिकेतील अभियांत्रिकी विभागातील वरिष्ठ सूत्रांनी वृत्तान्तला दिली. अशा स्वरूपाच्या क्लायम्बिंग वॉल जगभरात निर्माण होत असून त्यावर स्पर्धादेखील भरविल्या जातात. ठाण्यामध्ये अशा स्वरूपाची सुविधा प्रथमच उभी केली जात आहे, असे सूत्रांनी सांगितले. हा सहासी खेळ कसा खेळायचा याचे प्रशिक्षण देणारी यंत्रणाही महापालिका उभारणा आहे. यासंबंधीची निविदा प्रक्रिया लवकरच पूर्ण केली जाईल, अशी माहिती देण्यात आली.