ठाणे शहरात प्रमुख रस्ते, पदपथ अडवून बसलेल्या फेरीवाल्यांवर कारवाईसाठी ठाणेकरांना आणखी महिनाभर तरी वाट पाहावी लागणार आहे. ठाणे महापालिकेने न्यायालयाच्या आदेशानुसार या फेरीवाल्यांची नोंदणी मोहीम हाती घेतली असून, येत्या महिनाभरात जे फेरीवाले नोंदणी करणार नाहीत, त्यांच्यावर कारवाई सुरू  करण्यात येईल, अशी माहिती आयुक्त असीम गुप्ता यांनी शुक्रवारी पत्रकारांना दिली. फेरीवाल्यांची नोंदणी करण्यासोबत शहरात ‘ना फेरीवाला क्षेत्र’ निश्चित करण्याचे काम सुरू असून ‘सॅटिस’ तसेच रेल्वे स्थानकालगत रस्त्यांवर असे क्षेत्र निश्चित करण्याचा गांभीर्याने विचार केला जात आहे, असेही गुप्ता यांनी स्पष्ट केले. असे झाल्यास त्याठिकाणी बसणाऱ्या फेरीवाल्यांविरोधात कारवाई करणे अधिक सोपे जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. ठाणे, कळवा, मुंब्रा यासारख्या परिसरात गेल्या काही महिन्यांपासून मोठय़ा प्रमाणावर फेरीवाल्यांचा उपद्रव वाढला असून, रेल्वे स्थानकालगत असलेल्या ‘सॅटिस’ पुलावर जागोजागी फेरीवाले दिसू लागले आहेत. फेरीवाल्यांच्या वाढत्या उपद्रवामुळे आयुक्त असीम गुप्ता यांची कार्यपद्धती काहीशी वादग्रस्त ठरू लागली असून, प्रभाग स्तरावरून यासंबंधी कोणतीही कठोर पावले उचलली जात नसल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचा सूर व्यक्त होत आहे. ठाणे रेल्वे स्थानक, सॅटिस पूल, गोखले मार्ग या गर्दीच्या परिसरातही मोठय़ा प्रमाणात फेरीवाले व्यवसाय करीत आहेत. त्यामुळे फेरीवाल्यांचे अतिक्रमण प्रवाशांसाठी नित्याची डोकेदुखी ठरू लागली आहे. सर्वोच्च न्यायालयाने शहरात फेरीवाला धोरण राबविण्याचे आदेश महापालिकेस दिले आहेत. गेल्या काही वर्षांपासून महापालिकेस या धोरणाची अंमलबजावणी करणे जमलेले नाही. आयुक्त असीम गुप्ता यांनी उशिरा का होईना या धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. या धोरणासाठी दोन महिन्यांपूर्वी शहरातील फेरीवाल्यांना नोंदणी करण्याचे आवाहन महापालिकेमार्फत करण्यात आले होते. त्यासाठी प्रभाग समितीस्तरावर अर्जही वितरित करण्यात आले होते. मात्र हे अर्ज भरून देण्यासाठी फेरीवाल्यांनी फारसा प्रतिसाद दिलेला नसल्याचे समोर आले आहे.
अर्जाना प्रतिसाद नाही..
शहरात फेरीवाला धोरण राबविण्यासाठी प्रभाग समितीमधून ६०५४ नोंदणीचे अर्ज वितरित झाले, त्यापैकी २२१२ अर्ज जमा झाले आहेत. अर्ज भरण्याची मुदत संपली असली तरी या अर्जाविषयी फेरीवाल्यांपर्यंत माहिती पोहोचली नसावी. त्यामुळे अर्ज भरण्यासाठी एक महिन्याची आणखी मुदतवाढ देण्यात येत आहे. तसेच अर्ज भरून दिलेल्या फेरीवाल्यांना ओळखपत्र देण्याचे काम लवकरच सुरू करण्यात येईल, अशी माहिती असीम गुप्ता यांनी दिली. त्यानंतर मात्र नोंदणी नसलेल्या फेरीवाल्यांविरोधात जोरदार मोहीम हाती घेतली जाईल, असा इशारा गुप्ता यांनी दिला. शहरात कोणकोणत्या भागात ‘ना फेरीवाला क्षेत्र’ असावे याचाही विचार केला जात असून त्यानुसार पुढील पावले उचलली जाणार आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले. ‘सॅटिस’ तसेच रेल्वे स्थानक परिसराचा या क्षेत्रात समावेश करावा, यासंबंधीचा विचारही सुरू आहे, असेही ते म्हणाले.
ठाणे स्थानक लवकरच फेरीवालामुक्त
शहरातील फेरीवाला धोरण राबविण्याची प्रक्रिया लवकरच पूर्ण होणार असून, त्यामध्ये शहरात फेरीवाला झोनचे नियोजन करण्यात येणार आहे. त्यामुळे ठाणे रेल्वे स्थानक, सॅटिस तसेच शहरातील मुख्य रस्ते लवकरच फेरीवालामुक्त होईल, असा दावा गुप्ता यांनी केला आहे.