चेंबर ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्री असोसिएशन या संघटनेच्या वतीने सोमवार, २२ डिसेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता ठाण्याच्या वागळे इस्टेट येथील टिसा हाऊस येथे लघुउद्योजकांच्या गोलमेज परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. लघुत्तम, लघू व मध्यम उद्योग विकास संस्था, मुंबईचे संचालक आर. बी. गुप्ते यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. डॉ. राशी गुप्ता व पुरुषोत्तम अगवण हे या परिषदेमध्ये विषयाचे सादरीकरण करणार आहेत. परिषदेचे अध्यक्षस्थान डॉ. एम. आर. खांबेटे भूषविणार आहेत.
केंद्र सरकारच्या वतीने लघुत्तम, लघू व मध्यम उद्योग विकास कायदा करण्यात आला असून त्याद्वारे त्यांची स्पर्धात्मक ताकद वाढविण्यासाठी उपाय योजले जातात. या कायद्यामध्ये महत्त्वाचे बदल सुचविण्यात आले आहेत. त्यानुसार लघुत्तम, लघू आणि मध्यम उद्योगांच्या व्याख्येमध्ये असणारी गुंतवणुकीची मर्यादा दुप्पट करण्याची सूचना आहे. शिवाय एखादा उद्योग दिवाळखोरीत जात असल्यास त्यासाठीच्या काही उपाययोजना सुचविल्या आहेत. उद्योग बंद करण्याच्या दृष्टीनेही काय करावे लागेल यासाठी निर्देश दिले आहेत. याला जोडूनच राष्ट्रीय स्तरावर लघुत्तम, लघू व मध्यम उद्योग क्षेत्रासाठी नेमके कोणते धोरण असावे याबाबतचा ऊहापोह करणारा मसुदाही प्रकाशित केला आहे. या गोलमेज परिषदेमध्ये पूर्वसूचना देऊन सहभागी होता येईल. ०२२-२५८०३५३६ ई-मेल – cosia.cosia@gmail.com