खून, दरोडे, घरफोडय़ा यासारख्या गंभीर गुन्ह्य़ांचा छडा लावण्यासाठी तपासात मदत करणाऱ्या ठाणे ग्रामीण पोलिस दलातील कॅटरीना या श्वानाचे मंगळवारी निधन झाले. बुधवारी २४ फैऱ्यांची सलामी देऊन शासकीय इतमामात तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. भिवंडी परिसरात एका बेपत्ता गिर्यारोहकाचा शोध घेताना उष्माघाताने तिचा मृत्यू झाल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिली.
गेल्या चार ते पाच वर्षांपासून कॅटरीना ठाणे ग्रामीण पोलिस दलात कार्यरत होती. खून, घरफोडय़ा, दरोडे यासारख्या गंभीर गुन्ह्य़ांचा तपासात तिने मोलाची कामगिरी बजावली होती. १८ ऑक्टोंबर रोजी भिवंडी येथील मोहीली भागातील जुनाडगाव किल्ल्याजवळ नारायण चौधरी (६३) ट्रेकिंगला गेले होते. दरम्यान, पाय घसरून ते दरीत पडले होते. तीन दिवस शोध घेऊनही ते सापडत नव्हते. त्यामुळे त्यांच्या शोधासाठी कॅटरिनाला पाचरण करण्यात आले होते. चौधरींचा शोधासाठी करण्यात आलेल्या डोंगरच्या चढाईमुळे आणि दुपारचे वाढलेले तापमानामुळे तिला चक्कर आली. दरम्यान, तिला उपचारासाठी नेण्याआधीच तिचा मृत्यू झाला. वागळे इस्टेट पोलीस ठाण्याच्या परिसरात बुधवारी तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.