अकराव्या ‘थर्ड आय’ आशियाई चित्रपट महोत्सवात यंदा सुमारे ५० हून अधिक चित्रपट असून भारतासह तैवान, इराण, तुर्कस्तान, जपान, कझाकस्तान इत्यादी देशांतील विविध विषयांवरचे चित्रपट मुंबईकर चित्रपटरसिकांना पाहायला मिळत आहेत. ‘पिएटा’ या कोरियन चित्रपटाने महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले आहे. महोत्सवाचा समारोप गजेंद्र अहिरे दिग्दर्शित ‘अनुमती’ या मराठी चित्रपटाने केला जाणार आहे. यंदाचा महोत्सव अभिनेत्री स्मिता पाटील यांना समर्पित करण्यात आला आहे. महोत्सवाची यंदाची वैशिष्टय़े, विविध चित्रपट विभाग, लघुपट स्पर्धा विभाग याची झलक.१३ डिसेंबपर्यंत प्रभादेवीच्या रवींद्र नाटय़ मंदिर संकुलातील मिनी थिएटरमध्ये सकाळी १० ते रात्री १०.३० या वेळेत महोत्सवाचे चित्रपट दाखविण्यात येत आहेत.
‘थर्ड आय’ आशियाई चित्रपट महोत्सवाने भारतातीलच नव्हे तर आशियाई देशांमधील अन्य महोत्सवांमध्ये आपली ओळख निर्माण केली आहे. यंदाच्या अकराव्या ‘थर्ड आय’ महोत्सवाचे स्वरूप छोटेखानी असले, तरी वैविध्यपूर्ण चित्रपट विभागांतर्गत रसिकांना आशियाई सिनेमा, आशियाई संस्कृतीचे दर्शन घडविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
पदार्पणातील आशियाई दिग्दर्शकांच्या चित्रपटांचा स्पर्धा विभाग यंदाच्या अकराव्या ‘थर्ड आय’मध्ये नाही. परंतु, सहा वर्षांपासून सुरू झालेल्या लघुपट स्पर्धा विभागामध्ये बांगलादेशसह भारत आणि इराण इत्यादी देशांतील नव्या दमाच्या दिग्दर्शकांचे लघुपट आहेत.  लघुपट स्पर्धा विभाग सुरू करण्यामागची भूमिका सांगताना महोत्सवाचे संचालक सुधीर नांदगावकर म्हणाले की, पूर्ण लांबीचा चित्रपट ज्याला ‘फिचर फिल्म’ म्हणतात तो चित्रपट बनविण्याआधी दिग्दर्शक कथा लघुपट बनवितात. किंबहुना कथा लघुपट बनविणारे दिग्दर्शकच पुढे जाऊन संपूर्ण लांबीचे कथा चित्रपट बनवितात. माहितीपट बनविणारे दिग्दर्शक सहसा पूर्ण लांबीचे कथा चित्रपट बनविण्याकडे वळत नाहीत असे दिसून येते. आशियाई देशांमधील चित्रपट गेल्या काही वर्षांपासून जगभरातील अनेक प्रतिष्ठित अशा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये पारितोषिके मिळवीत आहेत. नव्या दमाचे, नव्या पद्धतीची मांडणी करणारे आशियाई दिग्दर्शक लघुपटांच्या माध्यमातूनच लोकांसमोर येत आहेत. म्हणून अशा नवे गुणवंत दिग्दर्शक बनवीत असलेल्या लघुपटांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी लघुपट स्पर्धा विभाग सुरू करण्याची कल्पना पुढे आली आणि आता गेल्या सहा वर्षांत चांगलीच रुजली आहे, अशी माहिती नांदगावकर यांनी दिली.
यंदाच्या लघुपट स्पर्धा विभागात  ‘व्हाइट अॅण्ड ब्लॅक’, ‘इमर्जन्सी एक्झिट’, ‘साबा’, ‘तकसीर’, ‘मिसअंडरस्टँडिंग परहॅप्स’, ‘द आय ऑफ मिरॅकल’, ‘द ऑक्टागोनल’, ‘थँक गॉड’, ‘मॅनर्स’, ‘इट वॉज माय सिटी’, ‘डॉल’ असे तब्बल अकरा लघुपट इराणचे आहेत. तर भरत पवार या मराठी दिग्दर्शकाचा ‘फेस टू फेस’ हा लघुपटही यात समाविष्ट आहे.  यावर्षी एकूण २०० लघुपट आशियाई देशांतून स्पर्धेसाठी आले होते, त्यापैकी २८ उत्कृष्ट लघुपटांची निवड करण्यात आली. विजेत्या लघुपट दिग्दर्शकाला ५० हजार रुपयांचे पारितोषिक दिले जाणार असून ‘हिवॉस’ या संस्थेने त्यासाठी पुढाकार घेतला आहे, अशी माहिती एशियन फिल्म फाऊण्डेशनचे अध्यक्ष किरण शांताराम यांनी सांगितले. महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी म्हणजे १३ डिसेंबर रोजी अभिनेत्री स्मिता पाटील यांचा २६वा  स्मृतिदिन असून त्यानिमित्त श्याम बेनेगल दिग्दर्शित ‘भूमिका’ हा चित्रपट दाखविण्यात येणार आहे.
तसेच बेनेगल स्मिता पाटीलविषयी रसिकांना सांगणार आहेत. गाजलेले जपानी दिग्दर्शक अकिरा कुरोसावा यांचे आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजलेले अनेक चित्रपट महोत्सवाच्या प्रेक्षकांनी पाहिले आहेत. परंतु, ‘हाय अॅण्ड लो’, ‘वन वंडरफुल संडे’, ‘द बॅड स्लीप वेल’ असे महोत्सवाच्या प्रेक्षकांनी फारसे न पाहिलेले चित्रपट यंदा पाहायला मिळणार आहेत. चित्रपट हे कलामाध्यम आहे याची जाणीव करून देऊन चांगले चित्रपट रसिक तयार करण्यासाठी फिल्म सोसायटीच्या माध्यमातून प्रदीर्घ काळ काम करणाऱ्या आणि वैशिष्टय़पूर्ण कलात्मक चित्रपटांचे दिग्दर्शन करणाऱ्या आसामी दिग्दर्शिका मंजू बोरा यांना यंदाचा सत्यजित राय स्मृती पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.     

अभिनेत्री स्मिता पाटील ही एक अष्टपैलू अभिनेत्री होती. हिंदी आणि भारतीय चित्रपटांमध्ये झळकलेल्या मराठी कलावंतांच्या मांदियाळीतील एक अतिशय संवेदनशील अभिनेत्री असा तिचा उल्लेख करावा लागेल. कोणत्याही पद्धतीची व्यक्तिरेखा समर्थपणे साकारण्याची तिची कुवत होती. मग ती भूमिका ‘ग्लॅमरस’ अभिनेत्रीची असो की एखादी साध्या दिसणाऱ्या मध्यमवर्गीय कुटुंबातील तरुणीची व्यक्तिरेखा असो, भूमिकेबाबत नीटपणे विचार करून ती ताकदीने रंगविण्याचे तिचे कौशल्य वाखाणण्याजोगे होते. नाटय़पूर्ण प्रसंग, नृत्याचे प्रसंग असोत, विनोदी प्रसंग असोत की तिच्यावर चित्रित होत असलेले गाणे असो सर्वच ठिकाणी ती स्वत:चा ठसा उमटविते. चित्रपटातील कोणतेही दृश्य, प्रसंग परिणामकारकरीत्या रंगविण्यातील स्मिता पाटीलचे कौशल्य दुर्मीळ होय. दुर्दैवाने स्मिता पाटीलची अभिनय कारकीर्द केवळ दहा वर्षांची ठरली. परंतु, या दहा वर्षांत तिने केलेल्या वैविध्यपूूर्ण भूमिकांच्या माध्यमातून आपला अमीट ठसा चित्रपट रसिकांवर तिने उमटविला.
श्याम बेनेगल

आवर्जून पाहावेत असे महोत्सवातील चित्रपट
– ‘सांजपर्व’ या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शन धनंजय कुलकर्णी यांचे असून अरुण नलावडे प्रमुख भूमिकेत आहेत. हा चित्रपट मंगळवारी दुपारी ४ वाजता दाखविण्यात येणार आहे.
– कझाकस्तानचा ‘स्टुडण्ट’ हा चित्रपट सोमवारी सकाळी १० वाजता दाखविण्यात येणार आहे.
– इंडियन व्हिस्टा विभागातील दीपक नांगलिया दिग्दर्शित मुंबई शहराची जीवनशैली या विषयावर ‘द मुंबई ट्रिलोजी’ या चित्रपटात तीन वेगवेगळ्या कथा असून हा चित्रपट रविवारी सकाळी ११.३० वाजता दाखविण्यात येईल.
– अकिरा कुरोसावा दिग्दर्शित ‘हाय अॅण्ड लो’ हा चित्रपट सोमवारी रात्री ८ वाजता
– तैवानी चित्रपट ‘ब्ल्यू ब्रेव्ह’ बुधवारी रात्री ८.३० वाजता
– ‘उत्तोरर सूर’ हा बांगलादेशी चित्रपट मंगळवारी सकाळी ११.३० वाजता.
– ‘स्लीपिंग प्रिन्सेस’ हा तुर्कस्तानचा चित्रपट बुधवारी सकाळी ११.३० वाजता.

महोत्सवात ‘अजिंक्य’ चित्रपट नाही
धनंजय कुलकर्णी दिग्दर्शित ‘सांजपर्व’ आणि समारोपाचा चित्रपट म्हणून गजेंद्र अहिरे दिग्दर्शित ‘अनुमती’ हे दोन मराठी चित्रपट महोत्सवात दाखविण्यात येतील. परंतु, तेजस देऊस्कर दिग्दर्शित ‘अजिंक्य’ चित्रपट दाखविण्यात येणार नाही, अशी माहिती महोत्सवातील सूत्रांनी दिली. भारतीय चित्रपट सेन्सॉरसंमत झाल्याशिवाय आंतरराष्ट्रीय
चित्रपट महोत्सवांमध्ये दाखविता
येत नाहीत. ‘अजिंक्य’ या चित्रपटाला
अद्याप सेन्सॉर प्रमाणपत्र मिळाले
नसल्याने हा मराठी चित्रपट दाखविण्यात येणार नाही.