दहावी व बारावीत शिकणाऱ्या खेळाडूंना केवळ उत्तीर्ण होण्यासाठी २५ गुण देण्यात येणार असून त्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने शाळांना दिलेल्या विहित नमुन्यात अर्ज करणे आवश्यक आहे. ज्या खेळाडूंनी किंवा शाळांनी अद्यापही सदरचे अर्ज सादर केलेले नसतील अशांनी २७ मार्चपूर्वी या कार्यालयास अर्ज सादर करावेत,  असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी संजय सबनीस यांनी केले आहे.
राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभाग घेतलेल्या खेळाडूंनी या कार्यालयाकडे प्रस्ताव सादर करताना आपल्या खेळाच्या जिल्हा संघटनेने जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय स्पर्धेची संपूर्ण माहिती जिल्हा क्रीडा कार्यालयाकडे सादर केली आहे किंवा नाही याबाबत आपल्या खेळाच्या संघटनेचे अध्यक्ष, सचिव किंवा स्पर्धा संयोजकांकडे संपर्क साधावा. त्यानंतरच आपले अर्ज या कार्यालयाकडे मूळ प्रमाणपत्रांसह सादर करावेत. जिल्ह्य़ातील दहावी आणि बारावीत प्रविष्ठ झालेल्या खेळाडूंना २५ अतिरिक्त गुणांसाठी नमुन्यातील अर्ज २७ मार्चपूर्वी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडे सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.