पावसाळ्यात खोदकाम करू नये, असे सूचनापत्र दिल्यानंतरही इंटरनेटच्या फोर जी सेवा देणाऱ्या रिलायन्स जिओ कंपनीने पनवेल शहरातील खोदकाम सुरूच ठेवल्याने पनवेल नगर परिषदेचे मुख्याधिकारी मंगशे चितळे यांनी बुधवारी या कंपनी विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याची कायदेशीर कारवाई केली.
रिलायन्स जिओ कंपनीतर्फे पनवेलकरांना फोर जी इंटरनेट सेवा देण्यात येणार आहे. त्यासाठी शहरातील १३ किलामोटरचे रस्ते खोदण्यात येणार आहे. या कामाला नगर परिषद प्रशासन आणि सभागृहातील सदस्यांनी पावसाळ्यात झालेल्या नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत हिरवा कंदील दाखविला होता. सभागृहाने खोदकामाला मंजुरी दिल्याने संबंधित कंपनीने खोदकामाला सुरुवात केली. नागरिकांच्या संतापानंतर किमान ही परवानगी पावसाळ्यानंतर द्यायला हवी होती, ही चूक प्रशासनाच्या व सदस्यांच्या ध्यानात आली. त्यानंतर प्रशासनाने कारवाईचे हत्यार उगारल्याचे बोलले जात आहे. इंटरनेट सेवा देण्यासाठी कंपनीने नगर परिषदेच्या तिजोरीत पावणेपाच कोटी रुपये जमा केले.
परवानगीचे आदेश पावसाळ्यात मिळाल्याने लगेच कामाला सुरुवात केलेल्या या कंपनीविरोधात नगर परिषदेने बुधवारी कठोर भूमिका घेऊन या कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश मुख्याधिकारी चितळे यांनी दिले. मंगळवारी या कंपनीच्या अधिकाऱ्यांना बोलावून चितळे यांनी तोंडी समज व लेखी सूचनापत्र दिले होते. तरीही या कंपनीचे अधिकारी एसटी स्टॅण्डजवळील रस्ते खोदत असल्याची माहिती मिळाल्यावर चितळे यांनी ही कारवाई केली.