अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य चळवळ या संस्थेतर्फे वर्धा येथे उद्या २८ फेब्रुवारी आणि १ मार्चला पहिले अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. वर्धा येथील मातोश्री सभागृहात होणाऱ्या या संमेलनस्थळाला बहिणाबाई चौधरी व्यासपीठ आणि महात्मा ज्योतिबा फुले साहित्यनगरी असे नामकरण करण्यात आले आहे.
या संमेलनाचे उद्घाटन उद्या २८ फेब्रुवारीला सकाळी ११ वाजता ज्येष्ठ शेतकरी कवी इंद्रजित भालेराव यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी शेतकरी संघटनेचे प्रणेते शरद जोशी राहणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून भीमराव पांचाळे, संजय पानसे उपस्थित राहतील. उद्घाटनानंतर दुपारी ३ वाजता ‘शेतकरी चळवळीच्या उदयापूर्वीचे आणि नंतरचे मराठी साहित्य’ या विषयावरील पहिल्या परिसंवादास सुरुवात होणार असून त्यात डॉ. दिलीप बिरुटे, प्रा. डी.एन. राऊत विचार मांडतील. अध्यक्षस्थानी डॉ. शेषराव मोहिते राहणार असून संचालन प्रा. राजेंद्र मुंढे करणार असल्याची माहिती संमेलनाच्या स्वागताध्यक्ष सरोजताई काशीकर आणि संयोजक गंगाधर सुटे यांनी संयुक्तपणे पत्रकार परिषदेत दिली.
पहिल्या दिवशीचा दुसरा परिसंवाद दुपारी सायंकाळी ४.३० वाजता सुरू होणार आहे. त्याचा विषय ‘आत्महत्या करण्यापूर्वी एका शेतकऱ्याने लिहून ठेवलेल्या पत्राचे त्याच्या विधवा पत्नीद्वारा वाचन’ असा आहे. अ‍ॅड. सुभाष खंडागळे आणि रवी देवांग हे त्यांचे मत मांडतील. अध्यक्षस्थानी डॉ. मानवेंद्र काचोळे राहतील तर संचालन मधुसूदन हरणे करतील. ‘शेतकरी स्त्री आणि मराठी साहित्यविश्व’ या विषयावरील तिसरा परिसंवाद सायंकाळी ६.१५ वाजता सुरू होणार असून त्यावर प्रज्ञा बापट आणि शैलजा देशपांडे आपले मत व्यक्त करतील. अध्यक्षस्थानी विद्युत भागवत राहतील. रात्री ७.३० वाजता शेतकरी गझल मुशायरा हा कार्यक्रम होईल. रात्री ९ वाजता बंडू पवार लिखित ‘उगवला नारायण’ या विषयावर एकांकिका सादर केली जाईल.
दुसऱ्या दिवशी १ मार्चला सकाळी ८.३० वाजता पहिल्या परिसंवादास सुरुवात होणार आहे. ‘शेतीसाहित्य आणि पत्रकारिता’ या विषयावर होणाऱ्या परिसंवादात पत्रकार सुनील कुहीकर, अविनाश दुधे, राजेश राजोरे, श्रीपाद अपराजित विचार मांडतील. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार अनिल महात्मे राहतील. संचालन पत्रकार प्रमोद काळबांडे करतील. सकाळी ११ वाजता ‘शेती आणि मराठी साहित्यविश्व’ या विषयावर सुरू होणाऱ्या दुसऱ्या परिसंवादात सुधाकर जाधव, मुरली खैरनार बोलतील. भास्कर चंदणशीव अध्यक्षस्थानी राहतील. संचालन गंगाधर सुटे करतील. दुपारी १२.३० वाजता सुरू होणाऱ्या कविसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध वऱ्हाडी कवी डॉ. विठ्ठल वाघ राहतील.
दुपारी ३ वाजता ‘शेतकरी आत्महत्या, राजकारण आणि साहित्यविश्व’ या विषयावरील परिसंवादाने या संमेलनाचा समारोप होईल. या विषयावर गुणवंत पाटील हंगरगेकर, विजय निवल, राम नेवले, अ‍ॅड. दिनेश शर्मा प्रकाश टाकतील. अध्यक्षस्थानी अ‍ॅड. वामनराव चटप राहणार असून संजय इंगळे तिगांवकर संचालन करतील. दोन दिवस चालणारे हे संमेलन व्यवस्थितरीत्या पार पडावे यासाठी विविध समित्या स्थापन करण्यात आल्याचेही त्यांनी  सांगितले.