नागपूर आणि परिसराचा विकास करीत असताना विदर्भातील इतर भागांकडेही सरकारने लक्ष देण्याची गरज आहे. अमरावती विभागातही विकासाचा मोठा अनुशेष आहे व त्या भागातही विकास प्रकल्प सुरू झाले पाहिजेत. भविष्यात त्या भागातील लोकांवर विकासाअभावी वेगळा व-हाड मागण्याची वेळ येऊ नये, असे उद्गार भाजपचे अमरावतीचे आमदार डॉ. सुनील देशमुख यांनी आज विधानसभेतील चच्रेदरम्यान काढले. राज्य सरकारने विदर्भाच्या विविध भागाच्या विकासावरही लक्ष केंद्रित करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी काढले.
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर नागपूरच्या विकासाच्या दृष्टीने पावले उचलली जाणार याची सर्वाना अपेक्षा होती. त्यानुसार, मिहानला मिळत असलेली चालना, काही कंपन्यांनी नागपुरात आपले कामकाज सुरू करण्यासंदर्भात दाखवलेला रस, नागपुरात आयआयएमचा प्रारंभ करण्याबाबत सुरू असलेले प्रयत्न हे सगळे नागपूरच्या विकासाला गती मिळत असल्याचे द्योतक समजले जात आहेत. नागपूर शहरातील नागरिकांप्रमाणेच, विदर्भातील इतर भागातील लोकांनाही देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मोठय़ा प्रमाणात अपेक्षा आहेत व त्या वेळोवेळी व्यक्त केल्या गेल्या आहेत.   गेली अनेक वष्रे विकासाचा अनुशेष असलेल्या विदर्भातील विविध जिल्ह्यातील विकास प्रकल्पांना फडणवीस यांच्या काळात चालना मिळेल, अशी आशाही लोक बाळगून आहेत. अशाच स्वरुपाच्या भावना राज्याचे माजी अर्थराज्यमंत्री असलेल्या डॉ. सुनील देशमुख सभागृहात व्यक्त केल्या.
‘राज्य शासनाकडून विदर्भातील जनतेला मोठय़ा प्रमाणात अपेक्षा आहेत. अमरावती विभागात मोठय़ा प्रमाणात विकासाचा अनुशेष आहे. नागपूर शहर व परिसरात नवीन प्रकल्प सुरू होत आहेत, ही चांगलीच गोष्ट आहे मात्र त्याबरोबरीने इतर जिल्ह्यांचाही विकास होण्याची गरज आहे. विकासकामांचे समन्यायी वाटप व्हावयास हवे. अनुशेषांतर्गत नवा अनुशेष तयार होऊ नये. विदर्भातील निरनिराळया जिल्ह्यातील क्षमता व गरजांनुसार त्या त्या भागात विकास प्रकल्प उभे राहणे आवश्यक आहे.  अमरावती विभागाचा विकास झाला नाही म्हणून उद्या तिकडच्या लोकांवर वेगळा व-हाड मागण्याची पाळी येऊ नये,’ असे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. संपूर्ण विदर्भात विकासाची प्रक्रिया सरकार सुरू करेल, असा आपल्याला विश्वास आहे, असेही ते म्हणाले.