गेल्या काही वर्षांपासून वाढीस लागलेला चंगळवाद ग्राहकांना मान्य असून अन्न, वस्त्र यासह इलेक्ट्रानिक गॅझेट, अन्य काही उपकरणांचे आकर्षण वाढले आहे, असा निष्कर्ष जीवन उत्सव उपक्रमांतर्गत ग्राहक दिनाच्या पाश्र्वभूमीवर, केलेल्या सव्‍‌र्हेक्षणात पुढे आला आहे. नामांकीत कंपन्यांच्या वस्त्र-प्रावणांना पसंदी देणारे ग्राहक खादीबद्दल मात्र अनभिज्ञ आहेत.
मराठी विज्ञान परिषद नाशिक शाखा, निर्मल ग्राम निर्माण केंद्र, लोकआधार यांच्यावतीने जानेवारी महिन्यात ‘जीवन उत्सव’ उपक्रमांतर्गत जीवनशैली सप्ताह राबविण्यात येतो. या सप्ताहात आपल्या दैनंदिन वागण्यात, वस्तु वापरण्यात काय बदल केला तर सुधारणा होतील याबाबत विविध प्रयोग केले जातात. ग्राहक म्हणुन वैज्ञानिक दृष्टिकोन विकसीत व्हावा, त्या दृष्टीने खरेदी व्हावी या अनुषंगाने हे सर्वेक्षण करण्यात आले. त्यात ग्राहकांची मानसिकता, वयोगट आणि आर्थिक परिस्थिती या तीन निकषांवर ४० प्रश्नांचा समावेश असलेली प्रश्नावली शहरातील चार हजार ग्राहकांना देण्यात आली. ठराविक कालावधीनंतर त्यातील १७०० प्रश्नावली उत्तरासह परिषदेला प्राप्त झाल्या. त्याचा अभ्यास केला असता गेल्या काही दिवसात वाढलेला चंगळवाद ग्राहकांना मान्य असल्याचे दिसून येते. नामांकित कंपन्याचे अन्न, नामांकित कंपन्याची वस्त्र-प्रावणे यांना पसंती असली तरी त्यात कॉटनला सर्वाधिक पसंती मिळाली आहे. केवळ कंपनी, संस्थेत नियम आहेत म्हणून सिंथेटीकची वस्त्रे उदा. कोट, टाय आदी सामान वापरावे लागते. मात्र खादीबाबत ग्राहकांमध्ये अनभिज्ञता आढळून आली. दुसरीकडे, चित्रपट, मालिका यातील नायक-नायिकांचा कपडे खरेदी करतांना पगडा असतो हा समज मोडीत निघाला आहे. ग्राहक आपल्या आवडीनुसार तसेच कशा प्रकारात आपण व्यवस्थित दिसू, आपली सोय होईल अशा कपडय़ांना प्राधान्य देत असल्याचे सर्वेक्षण सांगते. तुरळक ग्राहकांवर माध्यमांचा पगडा असल्याचे दिसून येते.
जाहिरातीचा प्रभाव शहरातील ग्राहकांवर प्रामुख्याने आहे. त्यात १५ ते ५० वयोगटातील ग्राहकांवर हा प्रभाव सर्वाधिक आहे. ३० ते ५० वयोगटातील ग्राहकांवर जाहिरातीचा प्रभाव फारसा दिसून येत नाही. तर ४० वर्षांच्या पुढे जाहिरातीचा प्रभाव असला तरी फार काळ टिकत नाही. उलट त्या जाहिरातींची चिकित्सा केली जाते, असे निदर्शनास आले आहे. इलेक्ट्रॉनिक गॅझेटसह अन्य घरगुती उपकरणे व तत्सम काही घटकांचे आकर्षण कायम असल्याचे सव्‍‌र्हेक्षणात स्पष्ट जाणवत असल्याचे परिषदेचे अजित टाके यांनी सांगितले. यामध्ये ४० टक्के लोक जाहिराती सहज पाहतात. एखाद्या उत्पादनामुळे आरोग्य तसेच पर्यावरणावर त्याचा काय परिणाम होऊ शकतो, याचा सारासार विचार कुठेही होत नसल्याचे सव्‍‌र्हेक्षणात दिसून आले. या बाबतची माहिती परिषदेचे अजित टक्के यांनी दिली. सर्वेक्षणातील निष्कर्षांचे सादरीकरण बुधवारी ग्राहक दिनानिमित्त केटीएचएम महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात करण्यात आले. महाविद्यालयाचा वाणिज्य विभाग आणि जीवन उत्सवच्यावतीने आयोजित कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य डॉ. दिलीप धोंडगे उपस्थित होते.