एकीकडे केंद्र आणि राज्य पातळीवर भाजपमध्ये विकासाच्या किंवा पक्षांतर्गत विषयांवर त्वरित निर्णय घेतले जात असताना नागपूर महापालिकेत मात्र सत्तापक्ष नेता निवडीचा घोळ अजूनही सुटलेला नाही. सत्तापक्ष नेता ठरविण्यासाठी इतका वेळ का? या प्रश्नांचे उत्तर सदस्यांजवळ नसल्यामुळे ते शांत बसले आहेत. रविवारी सकाळी झालेल्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात झालेल्या चर्चेत सत्तापक्ष नेत्याचे नाव निश्चित झाले असून ते तूर्तास गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे.
प्रवीण दटके यांची महापौरपदी नियुक्ती होऊन दोन महिन्याचा कालावधी झाल्यानंतर आठ दिवसात सत्तापक्ष नेत्याची निवड होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, दोन महिन्याचा कालावधी लोटला तरी सत्तापक्ष नेत्याचे नाव निश्चित करण्यात आले नाही. एकीकडे केंद्रात आणि राज्यात सत्ता आल्यानंतर विकास कामाचे प्रस्ताव असो किंवा पक्षांतर्गत नियुक्ती व अन्य विषय असो, त्यावर केंद्रीय व राज्य पातळीवरील नेत्यांकडून त्वरित निर्णय घेतले जात असताना महापालिकेत सत्तापक्ष नेता निवडण्यासाठी इतका उशीर का लागतो आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. चार दिवसांपूर्वी झालेली महापालिकेची सभा ही सत्तापक्ष नेत्याविना झाली. त्यामुळे विरोधी पक्षांकडून टीका झाली. सभागृहात काँग्रेसच्या एका सदस्याने सभागृहात प्रश्न उपस्थित केला. मात्र, त्यावर चर्चा झाली नाही. सभा आटोपल्यावर महापौर प्रवीण दटके यांना विचारणा केली असता त्यांनी संसदीय मंडळ सत्तापक्ष नेत्याबाबत निर्णय घेणार असल्याचे सांगितले होते.
राज्यात विधानसभा निवडणुका आटोपून भाजपची सत्ता स्थापित होऊन एक महिना झाला तरी सत्तापक्ष नेत्याबाबत निर्णय होऊ शकला नाही. सत्तापक्ष नेता म्हणून संदीप जोशी, गिरीश देशमुख, सुनील अग्रवाल, अविनाश ठाकरे आणि दयाशंकर तिवारी या सदस्यांची नावे चर्चेत आहे. पक्षाला त्यांच्यापैकी एक नाव निश्चित करण्यासाठी इतका वेळ का लागतो, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. संदीप जोशी, अविनाश ठाकरे आणि सुनील अग्रवाल हे देवेंद्र फडणवीस यांचे तर गिरीश देशमुख आणि दयाशंकर तिवारी हे दोन्ही सदस्य नितीन गडकरी यांचे समर्थक म्हणून ओळखले जातात. दावेदार असलेले सर्व सदस्य आपापल्या परीने गॉडफादरच्या माध्यमातून प्रयत्न करीत असताना त्यात कोणाची वर्णी लागते. याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, सत्तापक्षाबाबत नगरसेवकांमध्ये रस्सीखेच सुरू असताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये रविवारी सकाळी झालेल्या चर्चेत नाव निश्चितझाल्याची चर्चा होत असताना कोणाचे नाव आहे.  याकडे सवार्ंचे लक्ष लागले आहे.