केंद्रीय अन्नसुरक्षा विधेयकाअंतर्गत राज्यात सुरू करण्यात येणाऱ्या स्वस्त किमतीत अन्न वितरण योजनेचा शुभारंभ शुक्रवारी संध्याकाळी ४ वाजता नवी मुंबईतील दिघा येथील एमआयडीसीच्या नॉलेज सिटी मैदानावर होणार आहे. ठाणे जिल्हय़ात दहा लाख आर्थिकदृष्टय़ा दुर्बल व द्रारिद्रय़रेषेखालील नागरिकांचा समावेश असून त्यातील एक लाख लाभार्थ्यांना या कार्यक्रमासाठी बोलाविण्यात आले आहे. त्यामुळे नवी मुंबईत शुक्रवारी गरिबांचा कुंभमेळा भरणार असल्याचे चित्र आहे.
प्रजासत्ताक भारताच्या ६५ वर्षांनंतरही देशात उपाशीपोटी व कुपोषणाने मृत्यू पावणाऱ्या नागरिकांची संख्या लाखाच्या घरात आहे. त्यांना नाममात्र किमतीत अन्न मिळावे, यासाठी केंद्र सरकारने नोव्हेंबर महिन्यात अन्नसुरक्षा विधेयक-२०१३ मंजूर केले आहे. त्याची अंमलबजावणी सध्या सर्व सर्वत्र सुरू असून राज्यातील या योजनेचा शुभारंभ शुक्रवारपासून होणार आहे. त्यासाठी नवी मुंबईतील पटनी मैदान तयार करण्यात आले असून ठाणे जिल्ह्य़ातील १५ तालुक्यांतून एक लाख लाभार्थी येतील, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
नवी मुंबईतच या लाभार्थ्यांची संख्या ६१ हजार आहे. त्यासाठी पिवळे व केशरी शिधावाटप पत्रिका असणाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार असून कमीतकमी एक रुपयात ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ मिळणार असून एक लाखापेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या नागरिकांना शिधावाटप दराने अन्न खरेदी करावे लागणार आहे. राज्यात एकूण सात कोटी १७ हजार लाभार्थी असून ठाण्यातील या शुभारंभानंतर लोकसभा निवडणुकीअगोदर सर्व जिल्हय़ांत या योजनेचा शुभारंभ करण्यात येणार आहे. आघाडीच्या या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमासाठी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार, अन्न पुरवठा मंत्री अनिल देशमुख उपस्थित राहणार आहेत.
जिल्ह्य़ाचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्यावर या कार्यक्रमाच्या तयारीची जबाबदारी टाकण्यात आली असून पक्षाचे कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड, सिडकोचे अध्यक्ष प्रमोद हिंदुराव, आमदार किसन कथोरे, उपसभापती वसंत डावखरे यांच्यावर लाभार्थी आणि कार्यकर्ते कार्यक्रमास आणण्याची जबाबदारी आहे. या कार्यक्रमाचा जिल्ह्य़ासाठी जास्तीतजास्त फायदा कसा उठविता येईल यासाठी राष्ट्रवादी प्रयत्नशील असून या सर्व कार्यक्रमावर खासदार डॉ. संजीव नाईक लक्ष ठेवून आहेत.