संपाच्या माध्यमातून सत्ता परिवर्तन केले जाऊ शकते. वर्ष १९७४ मध्ये झालेल्या संप हे त्याचे जिवंत उदाहरण आहे, असे प्रतिपादन कामगार नेता आणि हिंद मजदूर सभेचे अध्यक्ष शब्बीर अहमद विद्रोही यांनी केले.
लोहिया अध्ययन केंद्रात ‘संपाने सत्ता परिवर्तन होते काय’ या विषयावर चर्चा आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. देशातील बदलती परिस्थिती आणि संप, आंदोलनाच्या माध्यमातून सत्ता परिवर्तनाच्या लहानसहान असफल प्रयत्न बघता, संप आणि त्याबाबत पुनर्विचाराची आवश्यक भासत होती. या बाबी लक्षात घेऊन लोहिया अध्ययन केंद्राच्या वतीने ही चर्चा आयोजित करण्यात आली. यावेळी १९७४ मध्ये झालेल्या देशव्यापी संपाला केंद्रस्थानी ठेवून चर्चा झाली. या संपाची सफलता आणि कारणांचा ऊहापोह करण्यात आला.
तत्कालिन सरकारचे दडपशाहीचे धोरण कामगारांना त्यांच्या अधिकारापासून वंचित ठेवू पाहत होते. रेल्वे कर्मचाऱ्यांच्या सामाजिक आणि रास्त मागण्यांकडे सरकार दुर्लक्ष करीत होते. त्यामुळे कामगारांमध्ये असंतोष वाढत गेला. याशिवाय नसबंदी योजना, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पराभवानंतर लावण्यात आलेली आणीबाणी. यामुळे देशातील जनता संतापली. त्यामुळे संप, आंदोलने झाली. संपाला जेवढे दाबल्या जाते तेवढा तो अधिक उग्र होत जातो. दडपशाहीने कधीच नांदलेली नाही. ती सत्ता परिवर्तनाचे कारण बनली आहे, असे विद्रोही म्हणाले.
केंद्राचे सरचिटणीस हरीश अडय़ाळकर यांचेही यावेळी भाषण झाले. संचालन डॉ. बाळकृष्ण महाजन यांनी केले आणि आभार कवी कृष्णकुमार द्विवेदी यांनी मानले.